रस्ते घोटाळ्यात अडकलेल्या अभियंत्यांवर विभागीच चौकशी न करताच पोलिसांनी अटक केल्यामुळे पालिकेतील अभियंते संतप्त झालेले असतानाच आता खड्डय़ांची तक्रार करण्यासाठी अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक थेट जनतेला उपलब्ध केल्यामुळे भडका उडाला आहे. नागरिकांना खड्डय़ांच्या तक्रारीसाठी आपला वैयक्तिक मोबाइल क्रमांक उपलब्ध केल्यामुळे आर-दक्षिण विभाग कार्यालयातील दुय्यम अभियंत्याने थेट प्रशासनालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी हबकले आहेत.

उच्च न्यायालयाने मुंबईमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांवरुन पालिकेला फटकारले असून त्यानंतर आपल्या २४ विभाग कार्यालयांत निवासी अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. तसेच रस्त्यांवरील खड्डय़ांची छायाचित्रे पाठविण्यासाठी प्रशासनाने निवासी अभियंत्यांचे व्हॉटस्अ‍ॅप नंबर वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन जाहीर केले आहेत. आपल्याला न विचारताच आपला व्हॉटस्अ‍ॅप नंबर नागरिकांना खड्डय़ांची तक्रार पाठविण्यासाठी उपलब्ध केल्यामुळे आर-दक्षिण विभाग कार्यालयातील दुय्यम अभियंता राकेश चौहान यांनी आपल्या विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवून जाब विचारला आहे.

आपला मोबाइल क्रमांक हा माझ्या पारिवारीक कामाकरिता वैयक्तीक स्वरुपाचा आहे, माझा वैयक्तीक मोबाइल क्रमांक नागरिकांना उपलब्ध करण्यासाठी माझी परवानगी घेण्यात आलेली नाही, वृत्तपत्रामध्ये माझा उल्लेख निवासी अभियंता असा करण्यात आला असून या बाबतीत यापूर्वी कोणतेही कार्यालयीन आदेश जारी केलेले नाहीत, माझ्या वैयक्तीक मोबाइलवर वारंवार तक्रार आल्यास माझे मानसिक व शारिरीक संतुलन बिघडू शकते, असे राकेश चौहान याने सहाय्यक आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

मी माझ्या मोबाइलवर व्हॉटस्अ‍ॅप वापरणे बंद केले आहे. तसेच माझ्या मोबाइलवर येणाऱ्या तक्रारींना आपण जबाबदार राहणार नाही, असेही राकेश चौहान यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

आर-दक्षिण विभागात आपली दुय्यम अभियंता म्हणून नियुक्ती झाली असून रस्ते अभियंता यांच्या कामाशी आपला कोणताही संबंध नाही. तथापि, रस्ते अभियंत्याची नेमणून करण्यात आलेली नसल्याने आपल्या आदेशानुसार मी माझे नियमित काम सोडून हे अतिरिक्त काम पाहात आहे, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

या दुय्यम अभियंत्याने सहाय्यक आयुक्तांना हे पत्र दिल्यानंतर पालिका प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. रस्ते घोटाळा प्रकरणात रस्ते विभागाचे तत्कालिन प्रमुख अभियंता अशोककुमार पवार आणि दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे पालिकेतील अभियंत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी दोन वेळा अभियंत्यांनी आझाद मैदानामध्ये आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता थेट अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक खड्डय़ांच्या तक्रारी करण्यासाठी नागरिकांना उपलब्ध केल्यामुळे संतापात भर पडली आहे. परिणामी, पुन्हा एकदा पालिकेतील अभियंत्यांचा उद्रेक होण्याची चिन्हे आहेत.

पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये तक्रार निवारण कक्ष असून तेथे अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.

रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डय़ांच्या तक्रारी या तक्रार निवारण कक्षामध्ये स्वीकाराव्यांत. तसेच तक्रार करण्यासाठी या कक्षांमधील दूरध्वनी क्रमांक प्रशासनाने नागरिकांना उपलब्ध करावे, असा बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंता संयुक्त कृती समितीच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

पर्जन्य जलवाहिन्या विभागाने तक्रार निवारण कक्ष स्थापन केले आहे. पावसाळ्यात पर्जन्य जलवाहिन्यांबाबतच्या तक्रारी या कक्षामध्ये स्वीकारल्या जातात.

पालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागात नागरी समस्यांबाबत तक्रारी केल्या जातात.  एका विभागांमध्ये खड्डय़ांच्या तक्रारी स्वीकाराव्या, असा सल्लाही कृती समितीच्या प्रतिनिधींनी दिला आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर खड्डय़ांच्या तक्रारींसाठी महानगरपालिकेने वॉर्डमधील रस्ते अभियंत्यांचे क्रमांक जाहीर केले आहेत. या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे खड्डय़ांच्या तक्रारी नोंदवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

अभियंत्यांची नावे व क्रमांक

ए – रामकरण यादव – ९९२००२८५९७, बी – भरत केदार – ९९६७७६९५३७, सी – विवेक झोडपे – ९८२०९६११३३, विनय उंबरजे – ७५०६६४४३१५, डी – राहुल कोल्हे – ८४५१९२३२३१, अमजद खान – ९८९२३०३९८९, ई – सूर्यवंशी – ९९६७२०८५९९, एफ उत्तर – पराग काळे – ९६१९९५३३७७, पिंपळडोहकर – ७५०६२६३९०५, एफ दक्षिण – माधव कुलकर्णी – ८८९८८८८९०२, विजय पवार – ९६१९४३६३७७, जी उत्तर – राहुल चव्हाण – ९९३०६६२२४०, राजेश राठोड – ९९३०३३०५६९, जी दक्षिण – संकेत भुजबळ – ९९६७६८६५३६, एच पूर्व – रोहित आफळे – ९८६७५९०४३०, कार्तिक गांधी – ९८२१८८७२५७, एच पश्चिम – आलोक सिंग – ९८२०७०४७४५, दिनेश भोसले – ८२६८८०००८८, के पूर्व – नितीन सोनाने – ९६१९७५१५६३, के पश्चिम – हिरेन गांधी – ९८७०८१९६२२, मिलिंद जाधव – ९८३३८१०५९६, पी दक्षिण – महेश नेमाडे – ९८१९५६७७५२, सचिन भुरके – ९८३३९३०६९५, पी उत्तर – सागर चारुडे – ९९३०१७६९६५, जगदीश सारंग – ९९२०६१९१४८, आर दक्षिण – एन. के. सावंत – ९९८७४६६३५७, गिरीश चव्हाण – ९८९२२७१५६४, आर उत्तर – अर्चना जाधव – ९७६९६२४४७७, हर्षल चव्हाण – ९००२२६१००२, आर मध्य – दुधभाते – ९६१९५७५८५६, नेरूळकर – ९६१९७७९४२१, शिंदे – ७०४५११०००४, एल – सचिन यादव – ९८३३७८९१६३, पी. व्ही. गवळी – ७७३८७५९४२४, व्ही. ए. कदम – ९७६८३८९१३२, जगदीश तुपे – ९००४०९९९७५, एम पूर्व – योगेश मोगल – ९९२०९९८४५६, अक्षय दळवी – ९८७००७९५३३, एम पश्चिम – प्रवीण नानोटे – ९५९४३१४२२३, सचिन काकडे – ९६१९२७५१६४, एन – सोमनाथ गोरे – ९९२००२५०६४, सविता वाघ – ९८९२४१४६०३, संध्या नलावडे – ९८७९९९८९७१, एस – दशरथ सुपे – ९१६७४६८१०७, नितीन नडगिरे – ९९६७६२४७२५, टी – वृषाली घोडेकर – ९९६९०३२८५३, निखिल कोळी झ्र् ९८२१२९९४४७