कोटय़वधींची मालमत्ता हडपल्याच्या आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपांप्रकरणी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या विरुद्ध केलेल्या चौकशीचा अहवाल महानगरदंडाधिकाऱ्यांनी बुधवारी न्यायालयात सादर केला. हा अहवाल मोहोरबंद असून पुढील सुनावणीच्या वेळी तो उघड होण्याची शक्यता आहे.
तुलसीदास नायर यांनी सिंह यांच्यावर मालमत्ता हडपल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करीत याचिका केली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळेस हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. अहवालाची प्रत नायर आणि कृपाशंकर यांनाही देण्याचे आदेश देत न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी २१ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.
कालिना, वाकोला आणि वांद्रे येथील आपली कोटय़वधींची मालमत्ता सिंह यांनी हडप केल्याचा दावा नायर यांनी याचिकेत केला आहे.
२००७ सालापासून सिंह आपल्याला जागा रिकामी करण्यासाठी धमकावत होते. सिंह यांनी आपल्या माणसांकरवी आपल्याला मारहाण केल्याचा तसेच आपल्याविरुद्ध तक्रार करणे सुरू ठेवले तर ठार करण्याची धमकीही दिल्याचा नायर यांचा आरोप आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणावरून आधीच चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले सिंह नायर यांच्या आरोपांमुळे आणखीन अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.