बंदी घालण्यात आलेली असतानाही पोलिसांशी हातमिळवणी करून हुक्कापार्लर चालविले जात असतील तर ही अतिशय गंभीर बाब असल्याचे ताशेरे ओढत ठाणे-घोडबंदर येथील ‘हॉलिवूड-१८’ हुक्कापार्लर पोलिसांच्या वरदहस्ताने सुरू असल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी ही चौकशी करून १० जानेवारी रोजी त्याचा अहवाल सादर करण्याचेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.
बंदी असतानाही ठाणे-घोडबंदर येथे ‘हॉलिवूड-१८’ हा हुक्कापार्लर चालविला जात असून त्यासाठी हुक्कापार्लर चालकांनी पोलिसांशी संगनमत केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका ‘क्रुसेड अगेन्स्ट टोबॅको’ या संस्थेतर्फे करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळी सरकार बंदी असतानाही हुक्का पार्लर चालविणे ही तर गंभीर बाब आहेच, परंतु पोलिसांशी हातमिळवणी करून ते चालविणे हे त्याहून गंभीर असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी त्याची चौकशी करावी आणि त्यासंदर्भातील अहवाल न्यायालयात सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.