फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला युरोपीयन महासंघाने  गतवर्षी बंद केलेले दरवाजे उघडले असले तरी फळांसाठी जागतिक मापदंडानुसार ४८ अंश तापमानात एक तास उष्णजल प्रक्रिया करण्याची अट असल्याने हापूस आंब्याची आजही युरोप वारी मंजूर झालेली नाही. या तापमानात आंब्यावर प्रक्रिया केल्यास आंबा आतून खराब होण्याची भीती व्यक्त केली जात असून, भारतीय निर्यातदार करीत असलेली ५५ अंश तापमानातील सहा मिनिटे उष्णजल प्रक्रिया पुरेशी आहे. या प्रक्रियेनंतर फळांतील फळमाशा (फ्रुटप्लाय) नष्ट होत असल्याचा दावा आहे. याची खातरजमा करण्याची जबाबदारी अपेडाने दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठावर सोपविली असून, मार्चअखेर पर्यंत अहवाल देणे बंधनकारक केले आहे. कोकणातील हापूस आंब्याची साल नाजूक असल्याने या संशोधनानंतरच हापूस आंब्याचा तापमान मानाकंन ठरणार आहे.
४८ अंश तापमानात तब्बल एक तास हापूस ठेवण्याची अट हापूस आंब्यासाठी काहीशी हानीकारक असल्याचे फळ बाजााराचे माजी संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.  ५५ अंश तापमानात केवळ सहा मिनिटे हापूस ठेवल्यानंतर त्यातील फळमाशा मूळापासून नष्ट होत असल्याचा निर्यातदारांचा दावा आहे.
 अपेडाने कोकणातील हापूस आंब्यासाठी योग्य तापमान निश्चित करण्यासाठी ३० लाख रुपये खर्च करुन दापोली येथील बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठाला संशोधन करण्यास सांगितले आहे. त्याच्या अहवालानंतरच कोकणातील हापूस आंब्यावरील पहिल्यांदाच तापमान मानांकन निश्चित केले जाणार आहे.
अहवाल आल्यानंतर अपेडा युरोपियन महासंघाशी चर्चा करुन उत्तम प्रतीचा फळमाशी मुक्त हापूस आंबा युरोप मध्ये पाठविण्याची जबाबदारी निश्चित करणार आहे. आखाती देशानंतर युरोप आणि इंग्लड ही हापूस आंब्यासाठी मोठी बाजारपेठ मानली जाते. चार महिन्यांच्या मोसमात दीड लाख हापूस आंब्याच्या पेटय़ा निर्यात केल्या जातात.

हापूस आंब्याच्या निर्यातीवर बरीच गणित अवलंबून आहेत. गेल्या वर्षी या निर्यातील ब्रेक लागला होता. यावर्षी ही निर्यात गुढीपाडव्यापासून सुरु होईल अशी आशा होती पण युरोपियन महासंघाने चांगल्या आंब्याची अपेक्षा व्यक्त करताना प्रक्रिया करुन पाठविण्यास सांगितले आहे. यातून लवकर मार्ग निघावा अशी अपेक्षा आहे.
-मोहन डोंगरे, हापूस आंबा निर्यातदार