नवरात्रोत्सवात विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान महिलांची छेडछाड काढल्याचा आणि त्यावरून एकावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप ठाण्याच्या चौघा तरुणांवर ठेवण्यात आला होता. मात्र त्यांचे वय लक्षात घेता तसेच मूळ तक्रारदारांनी त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी तडजोडीची तयारी दाखवल्याने उच्च न्यायालयाने चौघा आरोपींविरुद्धचा गुन्हा गुरुवारी रद्द केला. मात्र त्यांची अशीच सुटका न करता आणि केलेल्या कृत्याची सल त्यांना कायम राहावी यासाठी न्यायालयाने त्यांना सहा महिने ‘स्वच्छता अभियाना’ची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे या तरुणांना प्रत्येक रविवारी सकाळी व सायंकाळी प्रत्येकी चार तास ठाणे येथील टेकडी बंगला परिसरातील सार्वजनिक रस्त्यांची साफसफाई करावी लागणार आहे. विशेष म्हणजे हे काम चौघेही तरुण करत आहेत की नाही याचा अहवाल दर महिन्याला न्यायालयात सादर करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठाने या तरुणांविरुद्धचा गुन्हा रद्द करत त्यांना समाजसेवेची शिक्षा दिली आहे. चौघेही आरोपी ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील रहिवासी आहेत. नवरात्रोत्सवाच्या वेळी काढण्यात आलेल्या देवीच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस त्यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या काही महिलांची छेडछाड काढली. तसेच हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. या सगळ्या गोंधळानंतर संबंधित महिलांनी या चौघा तरुणांविरोधात पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली व आठवडाभर ते पोलिसांच्या ताब्यात होते. परंतु चौघांच्याही कुटुंबीयांनी तक्रारदारांकडे माफी मागत आरोपींविरोधातील तक्रार मागे घेण्याची विनंती केली.

तक्रारदारांनीही त्यांची विनंती मान्य केली. त्यानंतर आरोपींविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपींना गुन्हा रद्द केला तर समाजासाठी चांगले काम करणार का, अशी विचारणा केली. त्यावर समाजासाठी चांगले काम करण्यासाठी आपण तयार असल्याचे आरोपींना सांगितले.

तसेच आठवडय़ातून साफसफाई करण्याची तयारी त्यांनी दाखवली. मनातील घाण साफ झासी तरच या शिक्षेचा उपयोग होईल, असेही न्यायालयाने सुनावले. न्यायालयाने या चौघांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड सुनावून त्याची रक्कम टाटा रुग्णालयाला देण्याचे आदेश दिले आहेत.