देशातील प्रत्येक नागरिकाला वर्ष २०२२ पर्यंत त्याच्या स्वप्नातील घर साकार व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या अंतर्गत राज्यातील प्रत्येक नागरिकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून शहरासह ग्रामीण भागासाठीही ही योजना कार्यान्वीत करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या योजनेतंर्गत ग्रामीण भागात ३ लाख घरांची कामे सुरू केली असून त्यातील काही पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.

सर्वसामान्यांसाठी घरकुल असा आजच्या कार्यक्रमाचा विषय होता. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना २४३ शहरांत लागू झाली आहे. यामध्ये छोट्या शहरांचाही समावेश आहे. प्रत्येक छोट्या शहरांना आपले लाभार्थी ठरवायचे आहेत. नवीन प्रकल्पांनाही मान्यता दिली असून नगरपालिकांना प्रस्ताव देण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी म्हटले.

परवडणारी घरे देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. शहरातील अपुऱ्या जागा, वाढत्या किमती यामुळे घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळेच सरकारने सामान्यांच्या घरासाठी पाऊल उचलल्याचे ते म्हणाले. या वेळी फडणवीस यांनी वेगवेगळ्या घरकुल योजनांची माहितीही दिली. राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेबरोबरच रमाई योजना, शबरी योजना, पारधी योजना अशा विविध प्रकारच्या योजना नागरिकांसाठी आणल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या २० वर्षांपासून मुंबईतील बीडीडी चाळीचा रखडलेला प्रश्न राज्य सरकारने सोडवला असून चाळीतील प्रत्येकाला चांगली घरे देण्याचा सरकारने प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. जीएसटीमुळे म्हाडाच्या घरांच्या किमतीवर काहीच परिणाम होणार नसल्याचे ते म्हणाले. उलट जीएसटीमुळे घरासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंचे कर कमी होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांवर हा भार पडणार नाही, असे ते म्हणाले.