कुफीक, कुफीक फातीमा, कुफीक मगरीबी, इमारती कुफीक आणि सुल्स या तब्बल ३०० ते १४०० वर्षे जुन्या इराणी प्राचीन लिपी चित्रकलेच्या माध्यमातून पाहण्याची अनोखी संधी मुंबईकरांना लाभली आहे.

प्राचीन संस्कृतीचा ठेवा जपण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. याच प्रयत्नांचा भाग म्हणून हे इराणी हस्ताक्षरकलेचे प्रदर्शन मुंबईतील ‘कल्चर हाउस ऑफ द इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’ने भरविले आहे. कलेविषयी आणि विशेषत: प्राचीन लिपीविषयी आवड असणाऱ्या गोरी युसुफ हुसैन या कलाकाराने ही हस्ताक्षरकला प्रत्यक्षात उतरवली आहे. हुसैन मूळचे गुजरात मधील भरुच इथले. पहिल्यांदा त्यांनी आपली कला डफलीवर उतरवली. त्यानंतर टाईल्स व कॅनव्हास असा त्यांच्या कलेचा प्रवास झाला. या प्रदर्शनात गोरी यांना अफसानबानु मुलतानी यांची साथ लाभली. या प्रदर्शनात इराणमध्ये वास्तव्यास असणाऱ्या आजमोन या कलाकाराची चित्रेही आहेत. हे प्रदर्शन भविष्यात कॅनडामध्येही भरविण्यात येणार आहे.

या प्रदर्शनात वापरण्यात आलेला रंग झाडांचे खोड, पाने, फळे तसेच रंगीत दगडांपासून बनविण्यात आले आहेत. तर कॅनव्हास पेपर हा गव्हाची टरफले, बांबू आणि ताग यांपासून बनविण्यात आला आहे. प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे डफलीवरील हस्ताक्षर कला. त्यात प्रामुख्याने कुराणतील श्लोक रेखाटण्यात आले आहेत. या हस्ताक्षर कलेत कुफीक, कुफीक फातीमा, कुफीक मगरीबी, इमारती कुफीक आणि सुल्स या प्राचीन इराणी लिपीचा उपयोग करण्यात आला आहे. या लिपी कुफा, तुर्की, तुनिजीया आणि मोरोक्को या ठिकाणी ३०० ते १४०० वर्षांपूर्वी प्रचलीत होत्या. मुख्य म्हणजे भारतात मुघलसाम्राजात ही लिपी प्रचलीत होती. महाराष्ट्रात अजुनही या लिपीचे अवशेष पाहायला मिळतात. या प्राचीन भाषेच्या मुळ लिपीत काहीही बदल न करता ती सुंदर हस्ताक्षराच्या शैलीत जगासमोर आणणे तसेच ती जतन करुन ठेवणे व नव्या पिढीला तिची माहिती करून देणे, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे गोरी युसुफ हुसेन यांनी लोकसत्ताला सांगितले. हे प्रदर्शनात पाहून इराण व तेथील संस्कृतीच्या आठवणी ताज्या झाल्या, अशी उत्फुर्त प्रतिक्रिया पुण्याच्या इस्लामिक हस्ताक्षरकला कार्यशाळेचे संचालक फरिदून बेहममी यांनी व्यक्त केली.