२६/११च्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या ‘कामा’ रुग्णालयातील आया हिराबाई विजय जाधव गेली चार वर्षे सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बदली कामगार म्हणून हंगामी सेवेत असणाऱ्या हिराबाई आणि कैलास घेगडमल हे दोघे ‘त्या’ दिवशी कामा रुग्णालयात डय़ुटीवर होते. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ते जखमी झाले. त्यामुळे विशेष बाब म्हणून ‘त्यांना’ सेवेत कायम करावे, अशी शिफारस आरोग्य विभागाकडे करण्यात आली होती. मंत्री महोदयांनी तसे आश्वासनही दिले होते. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
त्या वेळी गोरेगावमध्ये राहणाऱ्या हिराबाई ‘२६/११’च्या रात्री कामा रुग्णालयात डय़ुटीवर होत्या. त्यावेळी कसाब व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गोळीबारात त्या जखमी झाल्या. त्यांच्या हाताला एक गोळी चाटून गेली. सुरुवातीला प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले. मात्र, वेदना कायम राहिल्या आहेत. पुन्हा तपासणी केली असता हातात काडतुसाचा तुकडा असल्याचे आढळले.
महिनाभरानंतर शस्त्रक्रिया करून तो तुकडा काढून टाकण्यात आला. या घटनेचा हिराबाईंना विलक्षण मानसिक धक्का बसला. जाधव कुटुंबीय त्यानंतर गोरेगाव सोडून अंबरनाथला राहण्यास आले.
तब्बल दीड वर्षे त्यांच्यावर मानसोपचार सुरू होते. आता या धक्क्यातून त्या सावरल्या असल्या तरी अजूनही कोठे फटाके वाजले की त्या अस्वस्थ होतात.
१९९१ मध्ये त्या कामा रुग्णालयात आया म्हणून रुजू झाल्या. त्यांची ही नोकरी हंगामी स्वरूपाची आहे. महिन्यातील २९ दिवस भरून एक दिवसासाठी सेवा खंडित केली जाते. सुरुवातीला त्यांना बाराशे रुपये वेतन मिळत होते. आता साडेनऊ हजार रुपये वेतन मिळते. या वेतनाव्यतिरिक्त रजा, भविष्य निर्वाह निधी तसेच अन्य कोणत्याही सुविधा त्यांना मिळत नाहीत. या पदी कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अठरा ते पंचवीस हजार रुपये वेतन मिळते.
२६/११ घडून चार वर्षे झाली तरीही शासनाने हिराबाईंना दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. हिराबाईंनी तर आता कायम सेवेचे स्वप्नही पाहणे सोडून दिले आहे. माझ्या ऐवजी माझ्या धाकटय़ा मुलास वारस म्हणून शासकीय सेवेत दाखल करून घ्यावे अशी अपेक्षा त्या आता व्यक्त करतात.