शाई-राडय़ानंतरही कसुरींच्या पुस्तकाचे प्रकाशन; युतीमधला संघर्ष टोकाला

‘मुख्यमंत्री मजबूर आहेत, सुधींद्र कुलकर्णी देशद्रोही आहेत आणि कसुरी ढोंगी आहेत’, असे तोफगोळे डागत, कसुरींच्या पुस्तक प्रकाशनास विरोध करताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले, पण त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा ठरलेला हा कार्यक्रम कडेकोट बंदोबस्तात पार पडला. महाराष्ट्रात सरकार भाजपचे असले तरी ‘रिमोट कंट्रोल’ मात्र शिवसेनेच्याच हाती राहणार या ईष्रेपोटी गेले वर्षभर सेना-भाजपमध्ये सुरू असलेला संघर्ष आता टोकाला गेल्याचे या घडामोडींमुळे स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील इंदू मिल परिसरात डॉ. आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा पायाभरणी समारंभ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला, तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर होते. सेनेच्या या बहिष्काराचीदेखील पंतप्रधानांनी दखल घेतली नाहीच, उलट, ‘हा क्षण काहींच्या नशिबातच नाही’ असा चिमटा काढत सेनेला आणखी डिवचले. या अपमानाचा बदला घेण्यासाठीच शिवसेनेने पाकविरोधाचे हत्यार उगारत पुन्हा संघर्षांचा पवित्रा घेतला. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या ‘नायदर हॉक नॉर अ डव्ह’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करण्याचा ‘गनिमी कावा’ सेनेने आखला. प्रकाशन सोहळ्याचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांना काळे फासून

वातावरणनिर्मितीही करण्यात आली. पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमास विरोध करणाऱ्या शिवसेनेने पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच थेट आव्हान दिल्याने, कार्यक्रम उधळण्याचे शिवसेनेचे आव्हान सरकारने कठोरपणे अंगावर घेतले. मुंबईत शिवसेनेचाच शब्द अंतिम राहील, असा संकेत देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न हाणून पाडून सेनेवर कुरघोडी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कोणती मात्रा वापरली, यावरच नंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.

शिवसेनेचा पाकिस्तानविरोध आजचा नाही. गेली २५-३० वष्रे शिवसेना पाकविरोधात संघर्ष करीत आहे, त्यामुळे पाकविरोधी आंदोलन सुरूच राहणार, असे सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी बजावल्यानंतरही संध्याकाळचा कार्यक्रम मात्र पार पडलाच. हा कार्यक्रम होऊ देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र सेनेने दिल्यानंतरही कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतल्याने, सेनेच्या संघर्षांच्या पवित्र्यावरच पाणी ओतल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट होऊ लागताच संजय राऊत यांनी दुपारी घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन कुलकर्णी, कसुरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. पाकिस्तानला विरोध हा शिवसेनेचा राजकीय कार्यक्रम नाही, तर हा मुद्दा देशभक्ती व राष्ट्रवादाशी निगडित आहे, असे सांगत फडणवीस यांच्या राष्ट्रवादाच्या भूमिकेसही राऊत यांनी डिवचले.

राऊत यांची ही पत्रकार परिषद सुरू असतानाच तिकडे वरळीच्या नेहरू सेंटर परिसरात मात्र कडेकोट पोलीस बंदोबस्ताची आखणी सुरू झाली होती. कार्यक्रमाच्या आसपास शिवसनिकाचे अस्तित्वदेखील राहू नये, यासाठी पोलिसांनी अक्षरश: जाळे पसरले होते. त्यामुळे कसुरी यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विनाव्यत्यय पार पडणार हे निश्चितच झाले होते. अखेर तसेच झाले. अनेक प्रतिष्ठित व नामवंतांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रकाशन सोहळा सुरू झाला. सकाळी शिवसनिकांनी अंगावर ओतलेल्या शाईचे सारे डाग पुसून सुधींद्र कुलकर्णी नव्या कपडय़ांनिशी कसुरी यांच्याशेजारी व्यासपीठावर आले आणि टाळ्यांच्या गजरात प्रकाशनाचा सोहळा पारही पडला. शिवसेनेचा विरोध मोडून काढत फडणवीस सरकारने या कार्यक्रमासाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावली आणि वर्चस्वाच्या लढाईतील पहिली फेरीही सहजपणे जिंकली. शिवसेनेच्या सत्तासहभागाच्या भविष्याकडे मात्र आता निरीक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसांत एखादी व्यक्ती किंवा एखादे मत मान्य नसेल, तर लोक हिंसाचाराचा मार्ग चोखाळतात किंवा त्यांच्याबाबत असहिष्णुता दाखवतात. ही देशासाठी चिंतेची बाब आहे. लोकशाहीमध्ये वेगळ्या दृष्टिकोनाचाही आदर राखण्यात आला पाहिजे. किमान जे लोक आमच्यासोबत आहेत, त्यांनी तरी लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि अशा प्रकारची हिंसक कृत्ये न करता त्यापासून दूर राहावे.
– लालकृष्ण अडवाणी,  ज्येष्ठ नेते भाजप