महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री रिजीजू व जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांच्यासाठी एअर इंडियाची विमाने रखडल्याचे प्रकरण पंतप्रधान मोदी यांनी गांभीर्याने घेतले आहे. या दोन्ही प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून अहवाल मागितला आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू असली तरी झालेल्या विलंबाबाबत मी प्रवाशांची माफी मागतो, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस मात्र आपल्यामुळे उशीर झालेलाच नाही, या भू्मिकेवर ठाम असून मायदेशी परतल्यावर अब्रुनुकसानीचे दावे दाखल करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आपण विमानामध्ये वेळेवर पोहोचलो होतो. आपल्या पाठीमागे बसलेले प्रवासी याला साक्ष आहेत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी हे आपला व्हिसा घरी विसरल्याने अमेरिकेकडे जाणारे विमान एक तास विलंबाने निघाल्याचा आरोप आहे. हे वृत्त पसरताच फडणवीस यांनी ट्विटरवरून असा काही प्रकार घडलाच नसल्याचा दावा केला.
केंद्रीयमंत्री रिजीजू हे २४ जून रोजी ‘सिंधू दर्शन’ कार्यक्रमाला उपस्थित राहून जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते निर्मल सिंग यांच्यासह दिल्लीला परतत होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर उडू न शकल्याने ऐन वेळी लेह येथून एअर इंडियाच्या विमानामध्ये केंद्रीय राज्यमंत्री किरण रिजिजू, त्यांचे खासगी सचिव व जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांच्यासाठी जागा करण्यात आली. यासाठी लहान बालकासह तिघा प्रवाशांना खाली उतरविण्यात आले व विमानाचे उड्डाण उशिराने झाले. या प्रकरणावरून भाजपच्या ‘व्हीआयपी’ संस्कृतीवर टीका होत आहे.
पंतप्रधान कार्यालयाने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे स्पष्टीकरण मागितल्यानंतर मंत्रालयाने फडणवीस आणि रिजिजू प्रकरणी अहवाल मागविला आहे. यानंतरच कारवाई करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे यांनी सांगितले.

या दोन्ही घटना गंभीर असून या प्रकरणी आपण नागरी विमान वाहतूकमंत्री या नात्याने प्रवाशांची माफी मागतो.
– अशोक गजपती राजू, केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री

रिजिजूंचा माफीनामा
खराब हवामानामुळे माझी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ऐनवेळी सोय करण्यात आली, मात्र प्रवाशांना उतरवण्यात आल्याची मला कल्पना नव्हती. या प्रकरणी मी माफी मागतो, असे रिजिजू यांनी गुरुवारी जाहीर केले. तर ‘आम्ही राजकारणी असल्यानेच असा राजकीय प्रचार केला जातो. प्रसिद्धीमाध्यमेच न्यायाधीशाची भूमिका पार पाडत आहेत, हे लोकशाहीसाठी योग्य नाही,’ अशा शब्दांत सिंह यांनी मात्र माफीची मागणी फेटाळली आहे.