यंदाच्या वर्षांतही बोगस प्रमाणपत्रांआधारे वैद्यकीयचे प्रवेश

गेल्या चार वर्षांप्रमाणेच यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या प्रवेश यादीतही अनेक विद्यार्थ्यांनी बोगस जात आणि जात वैधता प्रमाणपत्रांचा आधार घेत राज्यभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील नायर, केईएम, जेजे तर कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश घेतल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे.

सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. या महाविद्यालयांची २०१६-१७च्या शैक्षणिक वर्षांकरिता जागा वाटपाची पहिली प्रवेश यादी दोन दिवसांपूर्वी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. मात्र, या यादीत अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या आडनावांवर नजर टाकली असता अनेक विद्यार्थ्यांनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी महाविद्यालयांमध्ये शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. पठाण, शेख, खान, अन्सारी, खत्री अशा वेगवेगळ्या आडनावाच्या विद्यार्थ्यांनी अनुसूचित जमाती या प्रवर्गातून प्रवेश मिळविला आहे. नावांच्या यादीवर नजर टाकल्यास अशी किमान नऊ ते दहा प्रकरणे तरी आढळून येतात. या विद्यार्थ्यांचे ‘एमएचटी-सीईटी’ या सामाईक प्रवेश परीक्षेतील गुण २०० पैकी अवघे १०२, १३५, १४५, १६०, १५७, १४७ इतके आहेत. इतक्या कमी गुणांच्या आधारे केवळ बोगस जात व जात वैधता प्रमाणपत्रांच्या आधारे हे विद्यार्थी जेजे, केईएम, मिरज वैद्यकीय महाविद्यालय, टिळक, कूपर अशा दर्जेदार सरकारी व पालिका महाविद्यालयांमधील जागा पटकावण्यात यशस्वी झाले आहेत.

वैद्यकीय संचालकांनी या प्रकाराची तक्रार आपल्याकडे आली नसल्याचा दावा केला असला तरी २४ नोव्हेंबर २०१५ रोजी गेल्या चार वर्षांत १९ विद्यार्थ्यांच्या बोगस जात व जात पडताळणी प्रमाणपत्रांअभावी मिळविलेल्या प्रवेशाच्या घोटाळ्याची तक्रार संचालकांकडे करण्यात आली होती. तसेच, आदिवासी विकास विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडेही या प्रकाराची लेखी तक्रार करण्यात आली होती. वेळीच त्याची दखल घेऊन चौकशी करणे आवश्यक होते. राज्यात अशी प्रमाणपत्रे देणारी टोळीच कार्यरत असून सर्रास उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हादंडाधिकारी यांच्या नावाच्या खोटय़ा सह्य़ा आणि शिक्के बनवून तडवी, टाकणकार, भिल्ल, धोडिया या आदिवासी जमातींच्या नावाने खोटी जात व पडताळणी प्रमाणपत्रे बनवत असल्याचे दिसून येत आहे.

  • वैद्यकीय प्रवेशाबाबतची ही बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जितक्या आधीच्या वर्षांच्या प्रवेशांची चौकशी करता येईल तितकी आम्ही करू.
    • – गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री