बनावट चलत उन्मोचन प्रमाणपत्र (सीडीसी) आणि शासकीय शिक्के बनवणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
भारत सरकारकडून दिले जाणारे चलत उन्मोचन प्रमाणपत्र (सीडीसी) बनावट तयार करून ते विकण्यासाठी एक व्यक्ती घाटकोपर येथे येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना गुरुवारी मिळाली. दोन पथकांनी या  व्यक्तीला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक भारतीय आणि नऊ विदेशी सीडीसी, ‘रामण्णा अकॅडमी’ या संस्थेची ५ प्रमाणपत्रे, दूरसंचार मंत्रालयाच्या प्रावीण्य प्रमाणपत्राची मुखपृष्ठे, सरकारी नौवहन कार्यालयाचे दोन रबरी शिक्के व रोख मिळून सुमारे ८ हजार रुपयांचे साहित्य सापडले. त्याच्याविरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. राजीव रंजन नावाच्या या व्यक्तीने मुंब्रा येथील त्याचा साथीदार युसुफ बानदार याच्याबद्दल माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्यालाही अटक केली. पोलिसांनी या दोघांजवळून एकूण २९९ सीडीसी, भारत सरकार, दूरसंचार मंत्रालय आणि नौदल यांचे ४१ रबरी शिक्के, अ‍ॅम्बॉस केलेला कार्ड पेपर, लॅपटॉप, संगणक व इतर साहित्य मिळून ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.