एखाद्याने केवळ बनावट नोटा बाळगल्या असल्यास तो गुन्हा होत नाही. तर त्याच्याकडे बनावट नोटा आहेत याची त्याला जाणीव असायला हवी आणि तेव्हाच त्याच्यावर कारवाई होऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. शिवाय बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने मुन्शी मोहम्मद शेख याला दोषी ठरवून सुनावलेला शिक्षेचा निर्णयही रद्द करत त्याची तात्काळ सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.  
न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी मुन्शी याची निर्दोष सुटका करताना हा निर्वाळा दिला. ऑक्टोबर २०१३ मध्ये सत्र न्यायालयाने मुन्शीला बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवत त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. पोलिसांनी मुन्शीवर ठेवलेल्या आरोपांनुसार, १९ नोव्हेंबर २०११ रोजी तो कुर्ला येथील पंजाब नॅशनल बँकेमध्ये ९५०० रुपये रोख रक्कम जमा करण्यासाठी गेला होता. त्याने बँकेच्या रोखपालाकडे पाचशेच्या १७ व एक हजाराची नोट दिली. परंतु मुन्शीने दिलेल्या नोटांमधील काही नोटा बनावट निघाल्या.  बँकेने  प मुन्शीविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याला अटक केली.दरम्यान, मुन्शीला त्याच्याकडे बनावट नोटा असल्याची जाणीव होती हे सिद्ध करणारा पुरावा पोलीस सादर करू शकलेले नाहीत, असे न्यायालयाने  म्हटले आहे.