दोन हजार रुपयाची नवी नोट बाजारात येऊन आता अवघे काही दिवस झाले आहेत. मात्र कर्नाटकमध्ये दोन हजार रुपयाच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी कर्नाटकमधील चिकमंगळूर पोलिसांनी भारतीय दंड विधान ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

बनावट नोटा बनवणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांची अनेक पथके शहरात छापे टाकून गुन्हेगाऱ्यांचा शोध घेत आहेत. ‘एपीएमसी यार्डच्या एका व्यापाऱ्याने पोलिसांना शनिवारी संध्याकाळी संपर्क साधला होता. या व्यापाऱ्याला काही तासांपूर्वीच कोणीतरी दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा दिल्या होत्या,’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘जप्त करण्यात आलेल्या नोटा दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांची कलर कॉपी आहेत. या बनावट नोटा बनवणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी आम्ही पथके तयार केली आहेत,’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. देशभरात अनेक ठिकाणी व्यापारी आणि दुकानदारांकडून दोन हजाराची नोट स्विकारली जात नाही आहे. दोन हजार रुपयाचे सुट्टे नसल्याने खिशात दोन हजारांची नोट असूनही लोकांना दुकानातून रिकाम्या हाताने माघारी परतावे लागत आहे. काही ठिकाणी सुट्टे नसल्याने लोकांना दुकानदारांकडून दोन हजाराचे सामान खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे दुकानदार आणि ग्राहकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

परिस्थिती सुरळीत होण्यासाठी तीन आठवडे लागतील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. नव्या नोटांसाठी सध्याच्या एटीएम मशीन अनुकूल नाहीत. त्यामुळे त्यांच्यात बदल करावे लागतील. या सगळ्यासाठी साधारण तीन आठवड्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती जेटली यांनी दिली आहे. गोपनीयता राखायची असल्याने पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी एटीएममध्ये बदल करता येणे अशक्य होते, असे स्पष्टीकरण जेटली यांनी दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ नोव्हेंबरला पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली. या नोटांऐवजी २०० रुपयाच्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या आहेत. मोदींच्या घोषणेनंतर ९ नोव्हेंबरला देशभरातील बँका आणि एटीएम बंद ठेवण्यात आले होते. यानंतर १० नोव्हेंबरपासून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी लोकांनी बँकांबाहेर गर्दी केली.