गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख याच्या कथित बनावट चकमक प्रकरणात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना दोषमुक्त करण्याच्या मुंबईतील सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन याने याचिका केली होती. मात्र ही याचिका मागे घेण्याची त्याने केलेली मागणी उच्च न्यायालयाने सोमवारी अखेर मान्य केली आणि प्रकरण निकाली काढले.
न्यायालयाने रुबाबुद्दीनला फेरविचारासाठी महिन्याची मुदत दिली होती. न्यायमूर्ती निरगुडे यांच्यासमोर या प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने त्याला तीन वेळा त्याबाबत विचारणा केली. मात्र रुबाबुद्दीन निर्णयावर ठाम राहिल्याने न्यायालयाने अखेर त्याची याचिका मागे घेण्याची मागणी मान्य केली. या वेळेस सरकारी वकील संदीप शिंदे तेथे उपस्थित होते.
वकिलांशी मतभेद झाल्याचे कारण स्पष्ट करीत अमित शहा यांच्याविरोधातील याचिका मागे घेत असल्याचे कारण रुबाबुद्दीन याने सुरुवातीला न्यायालयाला दिले होते. वकिलांकडे विचारणा केल्यावर मात्र त्याने स्वत:च ही याचिका केल्याचे उघड झाले होते.