दहा कोटींची उपकरणे जप्त, ४० प्रकरणे उघडकीस

कोणताही परवाना हाताशी नसताना वैद्यकीय साहित्याचे आणि अस्थिव्यंग सामग्रीचे उत्पादन व विक्री करणाऱ्या राज्यव्यापी जाळ्याची पाळेमुळे अन्न व औषध प्रशासनाने खणून काढली आहेत. सरकारी रुग्णालयांना अस्थिव्यंग उपकरणे पुरविणाऱ्या बनावट एजंटांनी रुग्णालयांच्या आवारातच आपला धंदा थाटल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला. पाठोपाठ अन्न-औषध प्रशासनाने अशा उत्पादकांची शोध मोहीम सुरू केली आणि अस्थिव्यंग उपकरणांचे विनापरवाना उत्पादन व विक्री करणाऱ्या ४० कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत विनापरवाना उत्पादित केलेली सुमारे दहा कोटी रुपयांची उपकरणे हस्तगत करण्यात आली आहेत.

मुंबईतील जी. टी. आणि जे. जे. रुग्णालयांत विनीत तुकाराम पिंगळे नावाचा इसम मेडिकल सर्जिकल अँड हॉस्पिटल इक्विपमेंट या कंपनीच्या नावाने विनापरवाना वैद्यकीय साहित्य अवैधरीत्या साठवून विक्री करत असल्याचे दोन महिन्यांपूर्वी प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात उघडकीस आले होते. गुजरातमधील काही अस्थिव्यंग उपकरण उत्पादकांचा अधिकृत विक्रेता म्हणून नांदेड येथील एका विक्रेत्या पेढीकडून या साहित्याची विनापरवाना विक्री केली जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नांदेडमधील या पेढीवर छापे टाकण्यात आले आणि सुमारे एक कोटी दहा लाख रुपये किंमतीचा अनधिकृत साठा हस्तगत करण्यात आला. अस्थिव्यंग उपकरणांची विनापरवाना विक्री करणाऱ्यांचे जाळे राज्यात पसरले असल्याचे या चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर सुमारे ४० उत्पादक व विक्रेत्यांवर छापे टाकण्यात आले. कोणताही परवाना हाती नसताना अशा उपकरणांची विक्री करणे हा गुन्हा असल्याने नांदेड येथील कंपनीवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून ती राज्यातील पहिलीच कारवाई ठरेल, असा दावा अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ सूत्रांनी केला. अस्थिव्यंग सामग्रीचा विनापरवाना पुरवठा राज्यातील सुमारे २५ विक्रेत्यांना नांदेडच्या कंपनीकडून केला जात असल्याचेही उघडकीस आले आहे. जी. टी. रुग्णालयात उपकरणांच्या विनापरवाना साठय़ाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांची चौकशी समिती सरकारने नियुक्त केली होती. या समितीने तपास  अहवाल शासनास पाठविला आहे, अशी माहिती डॉ. लहाने यांनी दिली.

संबंधित वितरकाची माहिती मिळविण्यासाठी निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडेही संबंधित व्यक्तिचा तपशील उपलब्ध नव्हता. जे.जे. रुग्णालय समुहाच्या चारही रुग्णालयात निवासी डॉक्टरांच्या चार इमारती आहेत. सदर व्यक्तीला निवासी डॉक्टरांच्या निवासस्थानी कोणी जागा दिली याची माहिती मिळू शकली नाही कारण मार्डच्या प्रतिनिधींनी अशी कोणतीच नोंद ठेवली नव्हती. तथापि यापुढे रजिस्टर तसेच आवश्यक त्या नोंदी करून निवास वाटप करण्याची काळजी घेऊ असे ‘मार्ड’च्या प्रतिनिधींनी सांगितल्यामुळे तसाच अहवाल शासनाला पाठवला आहे. जे.जे. समुहाच्या रुग्णालयात केवळ दोन इंम्प्लांटची खरेदी करण्यात आली होती.’  डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता जे.जे.रुग्णालय