राज्यातील अनुदानित संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून देण्यात येणारी साठ हजार रुपयांची मदत वित्त विभागाने आर्थिक तरतूद करून न दिल्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये मिळाली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
वित्त विभागाने तरतूद न केल्यामुळे राज्यातील सुमारे ६८५ अनुदानित संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करताना मृत्यू पावलेल्या अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना साठ हजार रुपयांची विशेष मदत न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी ‘भीक मांगो’ आंदोलनाचा इशारा दिल्याचा मुद्दा उपस्थित करत शासन ही मदत केव्हा करणार असा प्रश्न आमदार ज्ञानराज चौगुले, समीर कुणावार, दिलीप वळसे-पाटील आदींनी विधानसभेत उपस्थित केला. मृत शिक्षकांच्या नातेवाईकांना फेब्रुवारी २०१५ पर्यंत वित्त विभागाने आर्थिक तरतूद न केल्यामुळे मदत मिळू शकली नसल्याचे लेखी उत्तरात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मान्य केले तसेच हा निधी तत्काळ वित्त विभागाकडून उपलब्ध करून संबंधितांना मदत करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.