गुजरातचे जवळपास सर्वच पदार्थ मुंबईच्या नाक्यानाक्यावर मिळतात. आता मुंबईत राहून गुजरातच्या पदार्थाचा बाज आणि चवही थोडी ‘बंम्बय्या’च झाली आहे म्हणा. पण एखादा पदार्थ दुसऱ्या प्रांतातून मुंबईत आला की त्यावर वेगवेगळे प्रयोगही होतात आणि मग तो पदार्थ त्या प्रांताचा न राहता मुंबईची ओळख बनून जातो. दाबेली हा गुजरातचा अतिशय प्रसिद्ध पदार्थ. वडापावशी साधर्म्य साधणारा हा पदार्थ. पण दाबेलीच्या कुटुंबातील एका वेगळ्या पदार्थाची अद्याप अनेकांना माहिती नाही. त्याचं नाव आहे ‘कडक मिसळ’.

मुंबईच्या नाक्यानाक्यावर मिळणाऱ्या ‘कच्छी दाबेली’चं मूळ हे नावाप्रमाणेच गुजरातमध्ये आहे. कच्छच्या मांडवीमधील हा पदार्थ. गुजराती भाषेत दबलेली म्हणजेच दाबेली. मांडवीमधील एका व्यक्तीने १९६० च्या आसपास बटाटय़ाच्या मिश्रणाचा एक विशिष्ट मसाला तयार करून तो पावाच्या मध्ये दाबून भरून देण्यास सुरुवात केली आणि बघता बघता त्याची कीर्ती सर्वदूर पसरली, तीच ही दाबेली. असं म्हटलं जातं की आजही मांडवीमध्ये तयार होणाऱ्या दाबेलीचा मसाला अस्सल असून इतर ठिकाणच्या मसाल्याला तशी चव येत नाही. ती घेण्यासाठी कधी तरी कच्छची वारी करावीच लागेल एकदा. पण दाबेलीनंतर कच्छमध्ये आणखी एका पदार्थाचा शोध लागला आणि त्याचं नाव म्हणजे ‘कडक’. मुंबईत हा पदार्थ आल्यावर त्याचं नामकरण ‘कडक मिसळ’ असं झालं. असं असलं तरी, कच्छमध्ये मिळणारी कडक आणि मुंबईत मिळणारी ‘कडक मिसळ’ यामध्ये थोडासा फरक आहे. कच्छमध्ये मिळणारी ‘कडक’ ही रस्सावाली असते. म्हणजे त्यामध्ये खजुराच्या चटणीची मात्रा थोडी अधिक असते. तर मुंबईची ‘कडक मिसळ’ ही घट्ट असते.

‘कडक मिसळ’ तयार करताना प्रथम हाताच्या तळव्यावर मावेल अशी पसरट वाटी घेतली जाते. जिरा बटर घेऊन ते कुस्करले जातात, मग फरसाण, मसाला शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा टाकून दाबेलीचा मसाला (बारीक कुटलेल्या मसाल्याला फक्कड फोडणी देऊन त्यामध्ये शिजवलेला बटाटा कुस्करून हा मसाला तयार होतो.) त्यामध्ये घेतला जातो. एका विशिष्ट पध्दतीने मोहरीची फोडणी दिलेली लसणाची पातळ चटणी आणि भरपूर खजूर चटणी त्यामध्ये टाकून हे सर्व मिश्रण एकजीव केलं जातं. त्यावर पुन्हा कांदा टाकून आणि मिश्रण झाकलं जाईल इतका शेवेचा थर लावून हातात ‘कडक मिसळ’ ठेवली जाते. ‘चीज कडक मिसळ’ हवी असल्यास, मिश्रण एकजीव झाल्यावर आणि शेवेचा थर चढवण्याच्या आधी चीज बारीक किसून टाकले जाते.

एकमेकांशी कसलाही संबंध नसलेल्या पदार्थाचे मिश्रण आणि गोडसरपणा कधीही न अनुभवलेल्या चवीचा आस्वाद घेत आणि मिटक्या मारत आपण मिसळ खातो. महाराष्ट्राची ओळख असलेली तर्रेदार मिसळ खाल्ल्यावर तोंडून ‘कडक’ हा शब्द बाहेर पडतो, तशीच ‘कडक’ दाद आपण या मिसळीलाही देतो. महाराष्ट्रीयन मिसळ पावासोबत खाल्ली जात असली तरी कच्छी मिसळ ही पावाशिवायच खाल्ली जाते.

हल्ली दाबेलीच्या नावाखाली लोकं कसाही मसाला तयार करतात आणि विकतात. पण कच्छच्या दाबेलीच्या मसाल्यामध्ये तब्बल ४२ खडा मसाल्यांचा वापर केला जाते. मूळचे कच्छचे असलेले स्टॉलचे मालक माणेकभाईसुद्धा तोच कित्ता इथे गिरवतात. त्यामुळे इथल्या दाबेलीची आणि कडकची चव इतर ठिकाणच्या तुलनेत अस्सलतेच्या अधिक जवळ जाणारी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. म्हणूनच की काय विरारहून चर्चगेटला आणि चर्चगेटहून विरारला जाणारी मंडळी पार्ल्याला उतरून दाबेली खाण्यासाठी धीमी लोकल पकडतात.

साधी दाबेली आणि कडक मिसळशिवाय जम्बो दाबेली, चीज दाबेली इथे मिळते. जैन पद्धतीनेही ते पदार्थ तयार करून दिले जातात. वेगळा पदार्थ म्हटल्यावर त्याच्या किमतीविषयी थोडी भीतीच वाटते. पण कडक मिसळ केवळ ३० ते ३५ रुपयांना मिळते. इतर दाबेलींची किंमत १५ ते २० रुपयांपासून सुरू होते.

कच्छभूज दाबेलीवाला

  • कुठे – डी. जे. रोड, सरला सर्जन शाळेजवळ, आíचज गॅलरीसमोर, विलेपाल्रे (प.), मुंबई</li>
  • कधी – सोमवार ते रविवार – स. ९ ते रात्री ९