उन्हाच्या झळांपासून वाघ, बिबटय़ांची सुटका करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांप्रमाणे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबटे हे वन्यजीवही त्रस्त झाले असून त्यांना उन्हाच्या झळांपासून थोडाफार दिलासा मिळावा यासाठी उद्यान प्रशासनातर्फे तापमापक, पंखे, छोटी तळी, धबधबे अशी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. एरवी एका जागी स्थिर नसणारे हे प्राणी उन्हाच्या झळ्यांपासून सुटका करून घेण्याकरिता येथील कृत्रिम तळ्यांमध्ये डुंबण्यात तासन्तास घालवताना दिसत आहेत.

मुंबईत काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबटे, सिंह यांना आल्हादायक वाटावे यासाठी प्रशासनातर्फे विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बिबटे, वाघ यांचे वास्तव्य ज्या परिसरात आहे तिथे दगड-मातीचे आकर्षक धबधबे व पाण्याची तळी तयार करण्यात आली आहेत.

एरवी वाघ, सिंह, बिबटे त्यांच्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या बंदिस्त पिंजऱ्यांमध्ये विश्रांती घेतात. वातावरणातील बदल टिपण्याकरिता बिबटय़ांच्या िपजऱ्यातील प्रत्येक खोलीत तापमापक लावण्यात आले आहे. तसेच प्रत्येक पिंजऱ्यात पंखे लावण्यात आले आहेत. त्यांना पिंजऱ्यातही गारवा मिळावा यासाठी ही सोय करण्यात आली आहे.

बिजलीआणि मस्तानीमजेत

चंद्रपूरहून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झालेल्या बिजली आणि मस्तानी यादेखील नव्या वातावरणात चांगल्याच रुळल्या आहेत. मुंबईतील दमट वातावरणाचा आणि वाढत्या तापमानाचा त्रास या वाघिणींना सहन करावा लागू नये म्हणून उद्यानात दोन पाण्याची तळी खास तयार करण्यात आली आहेत. या तळ्यांत उद्यानातील वाघ मनसोक्त पहुडलेले असतात. हे पाणी स्वच्छ राहावे या करिता ते दररोज बदलले जाते. अनेकदा पिंजऱ्यांत असतानाही त्यांच्या अंगावार पाण्याच्या फवारा मारला जातो.

वाढत्या तापमानाचा त्रास वन्य प्राण्यांना होऊ नये म्हणून उन्हाळ्यापूर्वीच आम्ही सर्व आमची यंत्रणा सज्ज केली होती. वन्यप्राण्यांना ३५ ते ४० डिग्रीपेक्षा जास्त तापमानाचा त्रास होतो. त्यामुळे खबरदारी म्हणून आम्ही उद्यानात जागोजागी छोटेखानी तळी, धबधबे बांधले आहेत. त्यात स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जाते. यात पडून राहायला त्यांना आवडते.

शैलेशे देवरे, उद्यानाचे व्याघ्र प्रकल्प अधिकारी