राज्यातील भाजप-शिवसेना सरकार संवेदनशील नसून ते शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. या सरकारविरोधात सुरु झालेला हा संघर्ष कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबणार नाही, असे ठाम निर्धार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथून संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी घेतलेल्या जाहीर सभेत खासदार अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ९ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरीही हे सरकार कर्जमाफी करत नाही. या सरकारमध्ये संवेदनाच राहिल्या नाहीत. मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळी कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ, यांची योग्य वेळ येणार नाही. हे पुढच्या निवडणुकीत पुन्हा कर्जमाफीचे आश्वासन देतील. आम्हाला शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव होती. म्हणून आम्ही देशातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. या सरकारमध्ये संवेदना आणि निर्णयक्षमता नाही त्यामुळे कर्जमाफी मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.

आम्ही पोकळ गप्पा मारत नाही. आम्ही कर्जमाफी करून दाखवली. हे सरकार निर्दयी आहे, त्यामुळे संघर्ष आणखी तीव्र करावा लागेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकारवर टीका केली. सरकार वाचवण्यासाठी १९ आमदारांचे निलंबन करून सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना मंत्रालयात मारहाण केली जात आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मागणे हा दोष आहे का, असा सवाल त्यांनी केला. याच सभेत बोलताना पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले. आमदारांचे निलंबन म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. सरकार निर्लज्ज असून पेटून उठलेले शेतकरी हे सरकार भस्मसात केल्याशिवाय राहणार नाहीत, असे ते म्हणाले. एकाही शेतकऱ्याने कर्जाची परतफेड करू नये, असे आवाहन आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव जाट येथील आत्महत्या केलेले शेतकरी बंडू करकाडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, पिपल्स रिपब्लिकन पक्ष, शेकाप, एमआयएम या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संघर्ष यात्रेला सुरुवात केली. करकाडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास आजपर्यंत सरकारच्या एकाही मंत्र्याला वेळ मिळाला नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी करकाडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच करकाडे यांचे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले.

या संघर्ष यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, शेकापचे धैर्यशील पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, मधुकर चव्हाण, बसवराज पाटील यांच्यासह विरोधी पक्षांचे आमदार उपस्थित होते.