शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. विरोधी पक्षात असताना दिंडी काढून कर्जमाफीची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्याची सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे. कर्जमाफीच्या मुद्दयावर सरकार गंभीर नसल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ द्वारे कर्जमाफीचा मुद्‌दा उपस्थित केला. कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारला जाब विचारणाऱ्या १९ आमदारांना निलंबित करण्यात आले. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलू देत नसल्याने तेथे विरोधी पक्षाने संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. सरकारच्या निषेधार्थ व कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आजपासून शेतकऱ्यांना सोबत घेऊन चंद्रपूर ते पनवेलपर्यंत संघर्ष यात्रा काढली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या धोरणाविरुद्ध तीव्र संताप आहे. राज्यातील सर्वपक्षीय आमदारांची शेतकरी कर्जमाफीची एकमुखी मागणी असताना, मुख्यमंत्री आपली जबाबदारी केंद्रावर ढकलत आहेत. केंद्राने तर उत्तरप्रदेश वगळता इतर राज्यांतील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अशा परिस्थितीत दुष्काळ, नापिकी, गारपीटीने त्रासलेला, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येच्या वाटेवर असलेला शेतकरी मुख्यमंत्री कर्जमाफीची घोषणा करतील, या आशेने अधिवेशनाकडे डोळे लावून बसला आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहीर करुन या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुंडे यांनी केली. मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीची घोषणा होण्यास विलंब होत असल्याने त्यांच्यावर मुंडे यांनी टीका केली. अधिवेशनाच्या चार आठवड्यांमध्ये मुख्यमंत्री केवळ दोनदा विधान परिषदेत आले, असेही ते म्हणाले.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्जमाफीबद्दल सरकार सकारात्मक आहे. कर्जमाफीसाठी ३० हजार ५०० कोटींची तरतूद करावी लागणार आहे. राज्याची खर्च करण्याची क्षमता नाही त्यामुळे नव्याने कामे हातात घेऊ शकणार नाहीत. तसेच जे शेतकरी कर्ज फेडत आहेत, त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी नवी योजना आणत आहोत. एका दिवसात हे प्रश्न सुटणार नाहीत. योजना तयार करण्यासाठी राज्याने केंद्राला विनंती केली आहे. ही योजना केवळ उत्तरप्रदेशसाठी नसून देशासाठी असणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री निवेदन करत असताना विरोधकांचा काही वेळ गेांधळ सुरूच होता.