मोहन भागवत यांचे मत; फायद्याच्या शेतीसाठी उद्योग व व्यापार जगताने प्रशिक्षण द्यावे

कृषीकर्ज माफ करणे हे शेती समस्यांवरील उत्तर नसून शेती फायद्याची व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेती फायद्यात चालावी यासाठी उद्योग व व्यापार जगताने शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे तसेच शेतीमालाला योग्य दर व हमी भाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांची समस्या सुटणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी मुंबईत केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरने आयोजित केलेल्या ४४ व्या वालचंद स्मारक व्याख्यानमालेत ‘समर्थ भारत’ या विषयावर भागवत बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संस्थेचे आजी व माजी पदाधिकारी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाकर्जमाफी’ जाहीर केल्यावर भागवत यांनी हे मत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

केवळ कर्जमाफीकरुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांना शेतीसाठी नवीन साधने दिली पाहिजेत, त्याचा उत्पादनखर्च कसा कमी होईल, यावरही विचार झाला पाहिजे. कृषी व उद्योग या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, त्याबाबत समान दृष्टीकोन हवा, असे मतही भागवत यांनी व्यक्त केले. समाजवादी व्यवस्थेत उद्योगाचे नुकसान करुन श्रमिकांच्या फायद्याचा विचार होतो तर भांडवलदार पाश्चात्य व्यवस्थेत श्रमिकांचे नुकसान करुन उद्योगाच्या फायद्याचा विचार केला जातो. भारतीय संस्कृतीत मात्र या दोन्ही घटकांच्या कल्याणासह सर्व समाजाच्या कल्याणाचा विचार असल्याचेही भागवत यांनी सांगितले.

शिक्षणपध्दतीत बदल हवा, अशी अपेक्षा व्यक्त करुन गणेश मंडळांनी ‘डीजे’ पेक्षा समाजप्रबोधन व समाजहिताकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही भागवत म्हणाले. पर्यावरण रक्षणाच्या केवळ घोषणा केल्या जातात, मात्र कृतीची वेळ आल्यावर पॅरिस येथे करारातून पलायनवादी भूमिका घेतली गेली, अशी टिप्पणीही भागवत यांनी अमेरिकेबाबत केली. चेंबरने प्रकाशित केलेल्या स्मरणिकेचेही प्रकाशन या वेळी भागवत यांच्या हस्ते झाले.