आवारात ग्राहकांना ताजा भाजीपाला-फळे मिळणार

शहरांतील नागरिकांना किफायतशीर भावात ताजा भाजीपाला-फळे उपलब्ध व्हावीत, यासाठी राज्यातील मुंबईसह सर्व महानगरपलिका आणि नगरपालिकांच्या मुख्यालयांच्या आवारात दर शनिवारी किंवा रविवारी शेतकरी बाजार भरविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार नगरविकास विभागाने तसे नियोजन करण्याच्या सूचना सर्व महापालिका व नगरपालिकांना दिल्या आहेत.

शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला, फळे, अन्नधान्य व अन्य कृषी उत्पादने थेट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून विकावी लागत होती. या पक्रियेत मध्ये दलाल असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी मालाला योग्य भाव मिळत नसे आणि ग्राहकांनाही भाजीपाला-फळांसाठी अधिकची किंमत मोजावी लागते. शेतकरी व ग्राहक यांच्यामधील दलालाची साखळी तोडून शेतात पिकलेला ताजा भाजापाला-फळे किफायतशीर भावात थेट ग्राहकांना विकता यावा, यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनिमय) कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंबंधीचा अध्यादेश नव्याने काढण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या वतीने सध्या विविध शहरांमध्ये ३० शेतकरी बाजार कार्यान्वयीत  केले आहेत. अशाच प्रकारे राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांच्या क्षेत्रात आठवडी बाजार भरविण्यात यावेत, जेणे करुन शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी मालाचे योग्य मूल्य मिळेल आणि ग्राहकांना स्वस्त दरात ताजा भाजीपाला-फळे उपलब्ध होतील, अशी शासनाची धारणा आहे.

त्यानुसार महापालिका व नगरपालिकांच्या मुख्यालयांच्या आवारात दर शनिवारी किंवा रविवारी शेतकरी बाजारासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने दिल्या आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारच्या बाजारासाठी नगपालिका क्षेत्रात किमान एक मैदान व महापालिका क्षेत्रात ३ ते चार मैदाने उपलब्ध करुन द्यावीत, असे या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन आदेशात म्हटले आहे.