कापूस व्यापाऱ्याकडून कापूस खरेदीचे बुडविण्यात आलेले कोटय़वधी रुपये मिळावेत म्हणून किसान प्रेरक अभियानातर्फे १४ शेतकऱ्यांनी मुंबईतील ‘मनोरा’ या आमदार निवासातील खोलीत बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. वर्धा येथील आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या ए-३२ या खोलीत हे उपोषण सुरू असल्याची माहिती प्रेरक किसान संघाचे अविनाश काकडे यांनी दिली.
कापूस व्यापारी सुनील टालाटुले यांनी शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीचे ८ कोटी २० लाख रुपये बुडविले आहेत. चाळीस दिवसांपूर्वी राज्य शासनाने ही रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे कबूल केले होते. मात्र आश्वासन मिळूनही ही रक्कम न मिळाल्याने उपोषणाचे पाऊल उचलावे लागल्याचे काकडे यांनी सांगितले.
काकडे यांच्या नेतृत्वाखाली या १४ शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी मंत्रालयात संबंधित अधिकारी, मंत्री यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे अखेरीस या शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.