आवक घटल्याने ग्राहकांना झळ; पुढील महिन्यातही स्वस्ताई दूरच राहण्याची चिन्हे

विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेले आक्रमक आंदोलन १० दिवसांपूर्वी मिटल्यानंतर आता भाज्यांची आवक घटली असून, परिणामी गेल्या तीन-चार दिवसांत मुंबई-ठाण्याच्या किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर एरवीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहेत. त्यातच, ऑगस्ट महिन्यात नवे पीक येईपर्यंत आवक कमीच राहणार असल्याने पुढचा महिनाही स्वस्ताई दूरच राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी व आपल्या इतर मागण्यांसाठी १ जूनपासून आक्रमक आंदोलन पुकारले होते. त्या काळात भाज्यांचा पुरवठा कमी झाल्याने उपलब्ध भाज्यांचे दर अचानक अव्वाच्या सव्वा वाढले होते. ११ जून रोजी राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पाच-सहा दिवस भाज्यांचा पुरवठा सुरळीत होता. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून त्याची आवक घटली आहे. पुणे, नाशिक, ओतुर आदी भागांतून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारख्या शहरांना मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्याचा पुरवठा होतो. सामान्यपणे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये रोज ७०० ते ८०० गाडय़ांची आवक होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ही आवक ५०० ते ५५० एवढी खाली आली आहे, अशी माहिती नवी मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समीतीमधील व्यापारी शंकर पिंगळे यांनी दिली.

भायखळा येथील मंडईत एरवी रोज १६० ते १७० ट्रक भाजी येते. गुरुवारी भाज्यांचे १२५ ट्रक आले. शिवाय मंडईत येणारी ४० टक्के भाजी ही चांगल्या प्रतीची नाही, असे भाजी मंडईतील संघटनेचे पदाधिकारी किरण झोडगे यांनी सांगितले. असे असतानाही भाज्या या चढय़ा किंमतीने विकल्या जात आहेत. ऑगस्ट महिन्यात नवे पीक येईपर्यंत भाज्या महागच असतील, असेही झोडगे म्हणाले. सध्या बहुतांश भाजी परराज्यांतून मागवली जाते. मुंबईतील मंडईत येणारा टोमॅटो बंगळुरूहून आणला जात आहे. स्थानिक आवक नसल्याने बंगळुरू, चेन्नई या भागांतूनच भाज्यांची आवक होत आहे, असे दादरच्या मंडईतील सुधाकर जाधव या विक्रेत्याने सांगितले.

दादर येथील क्रांतिसिंह नाना मंडईत भेंडी, गवार, फरसबी, वांगी या भाज्या ४० ते ६० रुपये किलोने विकल्या जात असून याच भाज्या किरकोळ विक्रेते ८० ते १०० रुपये किलोने विकत आहेत. शेतकरी संपापासूनच मिरचीचा भाव वधारलेला होता. आताही किरकोळ बाजारात एक किलो मिरचीसाठी ८० ते १०० रुपये आकारले जात आहेत. तर हिरवा वाटाणा १२० रुपये किलोने विकला जात आहे. संपाच्या काळात विकली जाणारी छोटय़ा पानांची चविष्ट कोथिंबीर मंडईतून गायब झाली आहे. संपाच्या काळात या कोथिंबिरीच्या जुडीची किंमत २०० रुपयांपर्यंत पोहोचली होती. सध्या मोठय़ा पानांची कोथिंबीर जुडीमागे ५० ते ७० रुपयांनी विकली जात आहे.

untitled-1