एटीव्हीएमवर जलद तिकिटाचा पर्याय

मोबाइल तिकीट, जेटीबीएस, एटीव्हीएम असे तिकीट काढण्याचे एकापेक्षा एक सुलभ पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या रेल्वेने आता आणखी नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानानुसार प्रवाशांना एटीव्हीएम यंत्रावरून फक्त दोन ‘क्लिक’वर तिकीट मिळणार आहे. त्यासाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिमने (क्रिस) ‘फास्ट तिकीट बुकिंग’ ही प्रणाली विकसित केली आहे. एटीव्हीएममधील हा पर्याय निवडून त्यानंतर येणाऱ्या स्थानकांच्या यादीतील आपल्याला हवे ते स्थानक निवडल्यावर त्या स्थानकापर्यंतचे तिकीट थेट प्रवाशांच्या हाती पडणार आहे. ही प्रणाली येत्या पंधरवडय़ात उपनगरीय रेल्वेमार्गावर लागू होईल.

प्रवाशांना झटपट तिकीट मिळावे, यासाठी मध्य रेल्वेतर्फे ‘हॉट की एटीव्हीएम’चा पर्याय सुचवण्यात आला होता. या यंत्रात पाच आणि दहा रुपये अशी दोन बटणे असून त्या टप्प्यातील स्थानकांची तिकिटे मिळणार होती. मात्र, घाटकोपरहून वडाळ्याला किंवा करीरोड येथून माहीमला जाण्यासाठी तिकीट दहा रुपयांचे असले, तरी कुल्र्याला किंवा दादरला गाडी बदलावी लागते. तो पर्याय या यंत्रात देता येत नव्हता. त्याचप्रमाणे या सोयीसाठी नवीन यंत्र तयार करावे लागले असते. नुकतीच रेल्वेने १८० पेक्षा जास्त नवी कोरी एटीव्हीएम यंत्रे घेतल्याने आता आणखी नवीन यंत्रे घेण्याऐवजी ‘क्रिस’ने या हॉट की एटीव्हीएमला हा ‘फास्ट तिकीट बुकिंग’चा पर्याय शोधला आहे.

या पर्यायानुसार एटीव्हीएम यंत्रामध्येच ‘फास्ट तिकीट बुकिंग’ असे बटण असेल. हे बटण दाबल्यावर प्रवाशांसमोर २० स्थानकांची यादी येईल. प्रत्येक स्थानकातील प्रवाशांचा तिकीट काढण्याचा कल लक्षात घेऊन प्रत्येक स्थानकातील एटीव्हीएम यंत्रांवर ही यादी वेगवेगळी असेल. या २० स्थानकांपैकी हव्या त्या स्थानकावर क्लिक केल्यावर प्रवाशांना तिकीट मिळेल. सध्या एटीव्हीएम यंत्रावरून तिकीट काढण्यासाठी चार वेळा क्लिक करावे लागते. हा वेळ कमी होणार असल्याची माहिती ‘क्रिस’च्या मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी दिली. या पर्यायानुसार एका व्यक्तीला एका वेळी द्वितीय श्रेणीचे एका बाजूचे एकच तिकीट काढता येणार आहे. अनेक तिकिटांसाठी एटीव्हीएमच्या साध्या प्रणालीचा वापर करता येईल.