तेलंगणातून हरवलेल्या, केवळ अपघाताने मुंबईत आलेल्या आणि गेल्या दोन वर्षांपासून माता-पित्याच्या शोधात फिरणाऱ्या एका मतिमंद मुलाला एका आधार कार्डाने त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविले आणि दुरावलेल्या बालकाला पुन्हा छातीशी घेताना त्या पित्याला गहिवरून आले.

उमरखाडी-डोंगरी येथील चिल्डेन्स एड सोसायटीअंतर्गत बालगृहात अन्य राज्यांतून आलेली किंवा हरवलेली सुमारे तीन ते साडेतीन हजार मुले दर वर्षी येतात. कालांतराने या मुलांच्या नातेवाइकांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा त्यांच्या नातेवाइकांकडे सुपूर्द केले जाते. त्याचप्रमाणे बाल गुन्हेगारांनाही या केंद्रात दाखल केले जाते. अशाच प्रकारे एप्रिल महिन्यात शिवाजीनगर पोलिसांना शंकर नावाचा एक मुलगा आढळून आला. पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शंकरला बोलता येत नसल्याने त्याच्या नातेवाइकांचा शोध लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला या बालगृहात दाखल केले होते. या बालगृहात शंकरसोबतच आणखी काही मतिमंद आणि मूकबधिर मुले होती. यातील काही मुलांना अन्य केंद्रात भरती करण्यात येणार होते. त्यांचा बुद्धय़ांक निश्चित करण्यासाठी रुग्णालयाकडून आधार क्रमांकाची मागणी करण्यात येते. यासाठी या केंद्राच्या अधीक्षक तृप्ती जाधव यांनी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बनसोडे यांच्याशी संपर्क साधून विशेष बाब म्हणून या सर्व मुलांची आधार नोंदणी करण्याची विनंती केली.

या मुलांच्या आधार नोंदणीची प्रक्रिया सुरू असतानाच शंकरचे आधार कार्ड पूर्वीच काढण्यात आल्याचे आढळून आले. मात्र त्याची सविस्तर माहिती उघड होत नव्हती. अखेर ‘यूआयडीएआय’च्या मुंबई कार्यालयातील अधिकाऱ्यांनी माणुसकीच्या दृष्टीने खास बाब म्हणून या मुलाची आधारमध्ये नोंदलेली माहिती उघड केली आणि शंकरचा घरचा पत्ता सापडला. त्यानुसार तेलंगणातील त्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात आला आणि शंकरला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.