भायखळा कारागृहात जाळपोळ, दगडफेक; तीन पोलिसांसह सहा जखमी

शिक्षणाची गोडी लावणारी, शिवणकाम शिकविणारी, प्रत्येक कठीण प्रसंगात आधार देणारी लाडकी मंजुळा गोविंद शेटय़े (४०) तथा मंजूताईचा अचानक मृत्यू झाल्याची बातमी ऐकून भायखळा कारागृहातील महिला कैद्याचा उद्रेक झाला. त्यांनी जाळपोळ, तोडफोड, दगडफेक असा एकच कल्लोळ केला. महिला कैद्यांना शांत करुन परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात शनिवारी दुपारी कारागृह प्रशासन आणि नागपाडा पोलिसांना यश आले. दरम्यान, कैद्यांच्या हल्ल्यात एकूण सहा जण जखमी असून त्यात तीन महिला पोलिसांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

untitled-24

मंजुळा शेटय़े भांडुपच्या नवजीवन शाळेत शिक्षिका होती. मात्र मोठय़ा वहिनीच्या हत्येचा आळ तिच्यावर आला. त्यात तिच्यासोबत आई गोदावरीलाही अटक करण्यात आली. पुढे न्यायालयाने या दोघींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तेव्हापासून मायलेकी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होत्या. मंजुळाच्या मृत्यूनंतर जेजे रुग्णालयात जमलेल्या शेटय़े कुटुंबाने मात्र ती हत्या नव्हतीच. ती आत्महत्या होती. मंजुळाच्या वहिनीने पतीच्या जाचाला कंटाळून जाळून घेत आत्महत्या केली. अखेरच्या काही क्षणात मोठय़ा भावाने पत्नीला मंजुळा आणि गोदावरी यांची नावे घेण्यास सांगितले. तसे न केल्यास पोटच्या दोन्ही मुलांना ठार मारेन, अशी धमकी दिली. याचा परिणाम मंजुळा, गोदावरी येरवडा कारागृहात पोहोचल्या, असे शेटय़े कुटुंबाने सांगितले.

कारागृह विभागातील एका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तेरा वर्षांमध्ये येरवडा कारागृहात शिक्षा भोगताना मंजुळाने अन्य निरक्षर महिला कैद्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. त्यांना शिकवले. ती शिवणकामही शिकवत होती. पत्र लिहून देणे, पत्रव्यवहार करणे, न्यायालयाकडून आलेल्या कागदपत्रांमध्ये नमूद मजकूर समजावून सांगणे, प्रत्येक कठीण परिस्थितीत आधार देणे हेही ती आवडीने करीत होती. त्यामुळे येरवडा कारागृहात ती कैदी, त्यांच्या नातेवाईकांपासून अधिकाऱ्यांचीही लाडकी बनली. चांगल्या वर्तणुकीमुळे मंजुळाला वॉर्डन करण्यात आले. तिच्यावर सुमारे ६० महिला कैद्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. सहा महिन्यांपूर्वी आई गोदावरीचे कारागृहात निधन झाले. त्यामुळे मंजुळा थोडी निराश होती. इतक्यात मुंबईच्या भायखळा कारागृहात महिला वॉर्डनच्या कमतरता भासल्याने मंजुळाची बदली येथे करण्यात आली. दीड महिन्यांपासून ती भायखळा कारागृहात वॉर्डन होती. येरवडय़ाप्रमाणे भायखळा कारागृहातील महिला कैद्यांना मंजुळाचा लळा लागला होता. पुढल्या सहा महिन्यांत शिक्षा संपवून ती मुक्त होणार होती.

कारागृहातील अधिकारी महिलेसोबत काही कारणावरून तिचा शुक्रवारी सकाळी वाद झाला. त्यात व्हटकर यांनी मंजुळाला मारहाण केली. त्याच सायंकाळी सातच्या सुमारास मंजुळा भोवळ येऊन पडली. तिला जेजे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र अध्र्या तासाने तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत पुढील चौकशी व तपास सुरू केला आहे. जेजे रुग्णालयात मंजुळाचे शवविच्छेदन पार पडले असून त्यातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी रात्री मंजुळाच्या मृत्यूची बातमी समजताच महिला कैद्यांच्या भडका उडाला. कारागृह अधिकारी, प्रशासनाविरोधात घोषणा देत कारागृहातील गाद्या, उशा, चादरी, लाकडी टेबल, खुच्र्या या कैद्यांनी पेटवून दिल्या. सकाळी या महिला कैदी कारागृहाच्या छतावर पोहोचल्या.

मंजूताई किंवा वॉर्डनचा कारागृह अधिकाऱ्यांच्या मारहाणीत मृत्यू होतो, मग आमचे काय, असा सवाल करत आम्हाला इथून बाहेर काढा, अशी बोंब या कैद्यांनी ठोकली. महिला कैद्यांनी हाताला मिळेल त्या वस्तू पोलिसांवर भिरकावण्यास सुरुवात झाली. ही परिस्थिती लक्षात घेऊन आर्थर रोड कारागृहातील महिला पोलिसांना भायखळा येथे धाडून मनुष्यबळ वाढवण्यात आले. तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नाही हे लक्षात येताच नागपाडा पोलिसांची कुमक कारागृहात पोच करण्यात आली. अखेर शनिवारी दुपारी महिलांचा उद्रेक थंडावला. ही परिस्थिती लक्षात घेत कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय, पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी भायखळा कारागृह गाठून चौकशी सुरू केली.

अधिकाऱ्यासह सहा कर्मचारी निलंबित

भायखळा कारागृहातील उद्रेकानंतर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत एक अधिकारी आणि पाच कर्मचारी (गार्ड) यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती अप्पर महासंचालक उपाध्याय यांनी दिली. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये महिला जेलर पोखरकर, गार्ड शिंगणे, नायपोडे, गुडवे, शेख आणि शेवकर यांचा समावेश आहे. वॉर्डन मंजुळा यांच्या मृत्यूनंतर उद्रेक घडला होता. मात्र आता इथली परिस्थिती आता शांत आहे. मी व उपमहानिरीक्षक साठे जातीने या प्रकरणात चौकशी करीत आहोत. महिला कैद्यांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत, असे उपाध्याय यांनी लोकसत्ताला सांगितले.

इंद्राणीची मदत

महिला कैद्यांचा उद्रेक शांत करण्यासाठी कारागृहात बरेच प्रयत्न झाले. त्यात मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून आवाहन करण्यात येत होते. या वेळी बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची मदत कारागृह अधिकाऱ्यांनी घेतली. इंग्रजीतून आवाहन करण्याची जबाबदारी इंद्राणीवर सोपविण्यात आली होती. तिने आवाहन केलेही, मात्र महिला कैद्यांनी तिला उद्देशून शिवीगाळ केली.

चौकशीची मागणी

मंजुळाला कोणताही आजार नव्हता. निश्चित कारागृहात मंजुळावर वाईट प्रसंग बेतला असावा. तिला मारहाण झाली असावी. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया मंजुळाचे मोठे बंधू अनंत शेटय़े, मावशी वासंती तेलंग यांनी व्यक्त केली.

मारहाणीमुळेच मंजुळाचा मृत्यू

मंजुळाचा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याचा निष्कर्ष जेजे रुग्णालयाने केलेल्या शवविच्छेदनातून काढण्यात आला आहे. जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुळाच्या संपूर्ण शरीरावर अनेक जखमा आढळल्या. शवविच्छेदनात तिच्या कवटीवरही जखम आढळली. त्यामुळे तिला डोक्यावरही आघात झाल्याचे उघड झाले आहे. या निष्कर्षांमुळे मंजुळाला मारहाण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. नागपाडा पोलीस ठाण्याने मंजुळाचा आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.