सामूहिक बलात्काराच्या दोन घटनांमुळे कुप्रसिद्ध झालेला महालक्ष्मी येथील शक्ती मिलचा परिसर कुंपण आणि नव्या प्रवेशद्वाराने सुरक्षित करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बुधवारी उच्च न्यायालयात देण्यात आली.
या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत आणि या घटनांची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी न्यायालयाने शक्ती मिलचा परिसर सर्वतोपरी सुरक्षित करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानंतर तीन टप्प्यांत शक्ती मिलचा परिसर सुरक्षित करण्याचा प्रस्ताव विभागाकडून न्यायालयात सादर करण्यात  आला होता.
न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्यासमोर याप्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. त्या वेळेस पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात कुंपण आणि प्रवेशद्वार बसविण्यात आले आहे. मात्र साफसफाईचे काम महिनाअखेरीस पूर्ण केले जाईल, असे विभागातर्फे सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने साहाय्यक लिक्विडेटरला पुढील आठवडय़ात परिसराची पाहणी करण्याचे आणि ६ मेपर्यंत त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर परिसरात हॅलोजन बसविण्याचा तिसरा टप्पा सुरू करण्याबाबतचे आदेश दिले जातील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.