लोकसभा निवडणुकीचे काम करून परतलेल्या पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यामुळे मुंबईमध्ये तापाच्या साथीने जोर धरला आहे. त्याचबरोबर हळूहळू हिवतापानेही डोके वर काढायला सुरुवात केली आहे. मात्र मुंबईत तापाची साथ असल्याचा पालिकेने स्पष्ट इन्कार केला आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आरोग्य विभाग साथप्रतिबंधक उपाययोजना करीत असतो. बांधकामे सुरू असलेली ठिकाणे, बंद पडलेल्या गिरण्या, पाणी साठण्याची ठिकाणे आदी ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी नित्यनियमाने कीटकनाशक आणि धूम्रफवारणी केली जात होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोठय़ा संख्येने पाठविण्यात आले होते. त्यामुळे यंदा उपाययोजनांची ही कामे योग्य पद्धतीने झालीच नाहीत.
पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी निवडणूक आयोगाला विनंती करून आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना तातडीने परत बोलावून घेतले. तसेच दोन पाळ्यांमध्ये युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेशही दिले. परंतु ही कामे योग्य प्रकारे झालेली नाहीत. त्याचाच परिणाम आता मुंबईत दिसू लागला आहे. खासगी दवाखान्यांमध्ये तापाच्या रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे. सर्दी-पडसे आणि अंगदुखीनंतर ताप येत असल्याची तक्रारही रुग्ण करीत असल्याचे काही खासगी डॉक्टरांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
दरम्यान, मुंबईमध्ये तापाची साथ नाही, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसरकर यांनी सांगितले.