दिवसभरात कधीतरी जोरात येणारी पावसाची सर, त्यानंतर कडक उन्हाचा तडाखा यामुळे पुन्हा एकदा विषाणूसंसर्ग तापाची साथ मुंबईत वाढीला लागली आहे. पालिकेच्या रुग्णालयात येत असलेल्या फ्लूच्या रुग्णांमध्ये २५ ते ४० टक्के वाढ झाली आहे. मलेरिया, डेंग्यू, लेप्टोच्या रुग्णांमध्ये फार वाढ झालेली नसली तरी साध्या तापामुळेच मुंबईकर हैराण झाले आहेत. त्यातच पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
दमट आणि उष्ण हवामानात विषाणूंची संख्या वाढते. त्यामुळे जूनमध्ये पावसाच्या सुरुवातीच्या काळात विषाणूसंसर्गच्या आजारांमध्ये वाढ होते. यावेळी पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने जूनमध्ये तापाच्या रुग्णांचे प्रमाण कमी होते. जुलैमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्यावर तापाचेही रुग्ण वाढले. त्यातच ऑगस्टमध्ये ओढ दिल्यानंतर हवेतील उष्णता अचानक वाढली. पावसाच्या अधूनमधून येत असलेल्या जोरदार सरींमुळे विषाणूवाढीसाठी वातावरण पोषक बनले. त्याचा परिणाम दिसू लागला असून जनरल डॉक्टरकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ‘गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत मलेरिया, डेंग्यूचे प्रमाण कमी असले तरी पावसाळ्यात वाढणारे विषाणूसंसर्गाचे आजार यावेळीही दिसत आहेत. ताप, सर्दी, खोकला यांचे रुग्ण वाढत असल्याचे’ डॉ. सी. एच. पासड म्हणाले.
जूनमध्ये पावसाने सुरुवात केली नव्हती. त्यामुळे तेव्हा तापाच्या रुग्णांची संख्या कमी होती. आता मात्र त्यात २५ ते ४० टक्के वाढ झाली आहे, असे नायर रुग्णालयातील मेडिसीन विभागाचे डॉ. राकेश भदाडे म्हणाले. मलेरिया, डेंग्यू, लेप्टो या रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र विषाणूसंसर्गामुळे अनेकांना त्रास होत आहे. शनिवारपासून पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. विषाणूंची संख्या वाढून संसर्ग होण्याचा कालावधी सात दिवसांचा असतो. त्यामुळे आठवडय़ानंतर तापाच्या रुग्णाची संख्या वाढू शकण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
अर्थात पाऊस मुसळधार असल्यास विषाणूंची अंडीही वाहून जातात व संसर्गाचे प्रमाण कमी होते. मात्र पावसाच्या सरी तसेच उन यांचा खेळ सुरू राहिल्यास तापाची साथ वाढू शकते. फ्लूचे एक हजारहून अधिक प्रकार आहेत. लहानपणापासून होत असलेल्या संसर्गामुळे शरीरात विषाणूसंसर्गाविरोधात प्रतिकारक्षमता तयार झालेली असते. मात्र सकस आहार व विश्रांती नसल्यास संसर्गाची शक्यता वाढते.

विषाणूसंसर्गाने आलेला ताप, सर्दी स्वनियंत्रित आजार आहे. सकस आहार आणि पुरेशी विश्रांती घेतली की तो तीन ते चार दिवसात बरा होतो.  थंडी वाजून ताप येत असेल, डोळे लाल झाले असतील, खोकल्यातून पिवळ्या, लाल रंगाची थुंकी निघत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लहान मुले, मधुमेही, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनीही वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. तुम्हाला संसर्ग झाला असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
त्यामुळे आजार पसरतात. खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करावा. हात स्वच्छ धुवावेत. गरम दूध, गरम चहा असे घरगुती उपाय केल्यास लवकर आराम पडतो.