उद्योगांना महाराष्ट्रात अखंड वीजपुरवठा सुरू असून त्यामुळे विजेबाबत देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील उद्योगांची परिस्थिती चांगली आहे, असा निष्कर्ष ‘फिक्की’च्या सर्वेक्षणात समोर आला आहे.
‘फिक्की’ने देशातील २० राज्यांमधील ६५० हून अधिक उद्योगांकडून वीज परिस्थितीबाबत माहिती-अभिप्राय घेतले. त्यात देशातील ३२ टक्के उद्योगांना आठवडय़ात १० तासांपर्यंत भारनियमन सहन करावे लागते. तर केवळ महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात या तीन राज्यांमध्ये विजेची परिस्थिती चांगली आहे, असे आढळून आले आहे. महाराष्ट्रात गेल्या ११ महिन्यांपासून आठवडय़ाचे सातही दिवस २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतील उद्योगांनी त्याचे कौतुक करीत महाराष्ट्रातील भारनियमनाचा पॅटर्न राबवण्याची मागणी केली होती.