मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात गुरूवारी कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. आज सकाळी ११ वाजता तुरूंगातील पापा नायर आणि गोपाळ शेट्टी टोळीतील कैदी एकमेकांना भिडले. यामध्ये गोपाळ शेट्टी आणि सलीम खान हे दोन कैदी जखमी झाले आहेत. पूर्ववैमन्यस्यातून ही हाणमारी घडल्याचे तुरूंग प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सलीम खान याने विरुद्द टोळीतील गोपाळ शेट्टी याच्यावर ब्लेडने हल्ला केला. त्याने गोपाळ शेट्टीच्या कपाळावर आणि हाताच्या कोपरावर ब्लेडने वार केले आहेत. सलीम खानलाही या हाणामारीदरम्यान दुखापत झाली असून दोन्ही कैद्यांना तातडीने जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.