मुंबई उच्च न्यायालयाने मार्डला प्रतित्रापज्ञ सादर करण्यास सांगितले आहे. ‘दुपारी तीन वाजेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा. अन्यथा कारवाईला सामोरे जा,’ असा थेट इशारा मुंबई उच्च न्यायालयाने ‘मार्ड’ला दिला आहे. मार्डच्या डॉक्टरांनी आंदोलन मागे न घेतल्याने मुंबई उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. ‘डॉक्टरांवरील कारवाईचा निर्णय रुग्णालयांनी घ्यावा. डॉक्टरांवर कारवाई करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र मार्डने द्यावे. अन्यथा मार्डवर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

‘दुपारी तीन वाजेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा. अन्यथा उच्च न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली केल्याप्रकरणी मार्डचे अध्यक्ष आणि सचिवांविरोधात कारवाई केली जाईल,’ अशा कठोर शब्दांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मार्डला सुनावले आहे. या दरम्यान मुंबई महापालिकेच्या वकिलांनी कालपर्यंत सायन रुग्णालयात मार्डच्या संपामुळे ३८ रुग्ण दगावल्याची माहिती दिली.

‘निवासी डॉक्टर न्यायालयाच्या आदेशानंतरही सेवेत रुजू होत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,’ असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. ‘डॉक्टरांनी आडमुठेपणाची भूमिका न सोडल्यास आम्ही त्यांचे रक्षण करु शकणार नाही,’ असेही उच्च न्यायालयाने ठणकावून सांगितले. ‘डॉक्टरांनी आडमुठेपणा कायम ठेवल्यास त्यांच्याबद्दल देण्यात आलेले निर्देश आम्हाला बदलावे लागतील. तुमच्या प्रतिनिधींनी न्यायालयात हमी देऊनही कामावर रुजू होत नसतील, तर ते चुकीचे आहे,’ असेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.