महापालिकेतील सत्ताधारी ‘भाजप’ने मुंबईतील खड्डय़ांवरून प्रशासनाला धारेवर धरले असून खड्डय़ांमुळे जर अपघात घडला तर संबंधित महापालिका अधिकाऱ्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘भाजप’ने केली आहे. ‘भाजप’चे ज्येष्ठ नगरसेवक अ‍ॅड. ज्ञानमूर्ती शर्मा यांनी ही मागणी केली असून ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत ही मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे मांडण्यात येणार आहे. दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरात खड्डेच खड्डे झाले असून त्यामुळे वाहनचालक आणि प्रवासी दोघेही हैराण झाले आहेत.
सर्वात जास्त म्हणजे २५२ तक्रारी या बोरिवली येथून आल्या होत्या. गोरेगाव, मालाड, अंधेरी, कुर्ला, दहिसर येथेही मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यांवरील या खड्डय़ांमुळे वाहनांच्या नुकसानीबरोबरच अपघात होत आहेत. या सगळ्याला महापालिकेची यंत्रणाच जबाबदार आहे, असा आरोप शर्मा यांनी केला आहे.
बोरिवली येथे पडलेले सर्व खड्डे तसेच अन्य भागात पडलेले खड्डेही बुजविले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मालाड, गोरेगाव, चेंबूर येथील अनुक्रमे ५, २ व ४८ तसेच कुर्ला येथील २६, अंधेरी येथील १५ आणि वांद्रे (पश्चिम) येथील ७ खड्डे बुजविण्याचे काम बाकी असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

तक्रारींचा लेखाजोखा..
एकूण खड्डे २,१८८
पाहणी २,०००
बुजविले १,८६०
शिल्लक १५०