‘इजा बिजा तिजा’, ‘झपाटलेल्या बेटावर’ सारखे चित्रपट, लघुपट देणारे निर्माते-दिग्दर्शक टी. सुरेंद्र अर्थात सुरेंद्र कृष्णाजी तळोकर यांचे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता पुण्यातील सह्य़ाद्री रुग्णालयात निधन झाले. गेले तीन वर्ष ते फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. ५६ वर्षीय टी. सुरेंद्र यांच्या पश्चात पत्नी शिल्पा आणि मुलगा सिध्देश असा परिवार आहे.
‘झपाटलेल्या बेटावर’ सारखा एक वेगळा थरारपट मराठी चित्रपटसृष्टीला देणारे टी. सुरेंद्र हे मूळचे अकोल्यातील होते. चित्रपटक्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने मुंबई गाठलेल्या सुरेंद्र यांनी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्याक डे दिग्दर्शनाचे धडे गिरवायला सुरूवात केली. त्यानंतर डॉ. जब्बार पटेल, गिरीश घाणेकर अशा दिग्दर्शकांबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले. त्याचदरम्यान प्रशांत दामले, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या तीन नामवंत मराठी कलाकारांना घेऊन त्यांनी ‘इजा बिजा तिजा’ हा धम्माल विनोदी चित्रपट केला. स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. १९९३ साली आलेल्या ‘झपाटलेल्या बेटावर’ या थरारपटासाठी त्यांना दोन राज्य पुरस्कार मिळाले होते.
चित्रपट दिग्दर्शनानंतर त्यांनी चित्रपट निर्मितीकडे आपला मोहरा वळवला होता. ‘टी. सुरेंद्र प्रॉडक्शन्स’ या निर्मितीसंस्थेची स्थापना करत त्यांनी जाहिरातपट आणि लघुपटांच्या क्षेत्रात आपले पाय रोवले. कुटुंब नियोजनाचे महत्व पटवून देणारी ‘गरज कुटुंबनियोजनाची’, रक्तदानावरची ‘रक्तसंजीवनी’, हुंडा घेण्याच्या प्रथेवर टीका करणारी ‘निर्णय’, लातूरमध्ये आलेल्या भूकंपानंतरचे चित्रण करणारी ‘कसोटी’ अशा अनेकविध लघुपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केले होते. शासनासाठी तसेच काही नामांकित कंपन्यांसाठी लघुपट आणि जाहिरातपटांचे दिग्दर्शन टी. सुरेंद्र यांनी केले होते. त्यांच्या ‘नीती’ या अ‍ॅनिमेटेड लघुपटाला ‘रिव्हर टु रिव्हर’ या आठव्या फ्लॉरेन्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला होता. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून त्यांच्या लघुपटांना स्थान मिळाले होते.