सदोष मनुष्यवधाच्या आरोपांतर्गत सुरू असलेल्या खटल्यात आपल्या बचावार्थ एकमेव साक्षीदार सादर केल्यानंतर अभिनेता सलमान खान याच्या वतीने साक्षीपुरावा पूर्ण झाल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. सरकारी आणि बचाव पक्षाकडून सादर करण्यात आलेले साक्षीपुरावे नोंदविण्याचे काम पूर्ण झाल्याने अंतिम युक्तिवादाला बुधवारपासून सुरुवात करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारी पक्षाला दिले आहेत.
सलमानच्या चालकाला बचाव पक्षाचा साक्षीदार म्हणून सोमवारी न्यायालयासमोर साक्षीसाठी हजर करण्यात आल्यावर अ‍ॅड्. श्रीकांत शिवदे यांनी आपल्याकडून अन्य साक्षीदार तपासला जाणार नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर अतिरिक्त न्यायमूर्ती डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सरकारी पक्षाला बुधवारपासून अंतिम युक्तिवादाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. सरकारी पक्षाकडून एक आठवडा अंतिम युक्तिवाद करण्यात येणार असून त्यानंतर सलमानच्या वतीने युक्तिवाद केला जाईल. त्यामुळे एप्रिल अखेरीपर्यंत सलमानविरोधात आधी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर व आता सत्र न्यायालयात सुरू असलेला १३ वर्षे जुन्या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
सोमवारीच सलमानचा चालक अशोक सिंग याने साक्ष देताना ‘त्या’ रात्री सलमान नाही, तर आपण गाडी चालवत असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. तसेच हा अपघात मद्यधुंद गाडी चालविल्याने झाला नव्हता, गाडीचा टायर फुटल्याने झाल्याचा दावाही त्याने न्यायालयाकडे केला होता. शिवाय न्यायालयीन प्रक्रियेची माहिती नसल्याने एवढी वर्षे गप्प बसल्याचे आणि सलमानचे वडील सलीम खान यांच्या सल्ल्यानंतर खरे काय ते सांगण्यासाठी आपण एवढय़ा वर्षांनंतर न्यायालयासमोर हजर झाल्याचाही दावा त्याने केला होता.