आयएमईआय क्रमांक बदलणाऱ्या टोळीमुळे आव्हान
एखाद्या गुन्ह्य़ाची उकल होण्यासाठी मोबाइल फोनचा ठावठिकाणा शोधून काढून आरोपीला जेरबंद करणे पोलिसांना सहज शक्य होते. याचे कारण म्हणजे मोबाइलचा आयएमईआय क्रमांक; परंतु हा क्रमांकच खोटा असल्यास मोबाइल फोनचा ठावठिकाणा शोधणे कठीण आहे. मोबाइलचा आयएमईआय क्रमांकच एका सॉफ्टवेअरच्या मदतीने बदलला जात असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे भविष्यात पोलिसांपुढे तपासात आव्हान निर्माण होणार आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येची उकल करताना पोलिसांनी तब्बल दोन लाख मोबाइल फोनचा ठावठिकाणा तपासला. त्यासाठी आयएमईआय क्रमांक महत्त्वाचा होता; परंतु हा क्रमांकच खोटा असता तर मोबाइलचा ठावठिकाणा शोधणे कठीण झाले असते. मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षानेच अशाच टोळीचा परदाफाश अलीकडे केला. काही महिन्यांपूर्वी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुखलाल वर्पे यांनीही अशाच टोळीचा बुरखा फाडला. चोरीच्या मोबाइलचे आयएमईआय क्रमांक बदलण्याची कामे या टोळ्या करीत होत्या. आयएमईआय क्रमांक बदलण्याच्या पद्धतीमुळे गुन्ह्य़ाची उकल करण्यात आव्हान निर्माण झाल्याचे सहआयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी यांनीही मान्य केले.
दररोज किमान १० ते १५ मोबाइल फोन चोरीला जातात. पोलीस ठाण्यात त्याची नोंदही आढळत नाही. याचे कारण म्हणजे मोबाइल फोन चोरीला गेला तरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी हरविल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. हरवलेल्या फोनचा शोध घेण्यासाठी आयएमईआय क्रमांक संबंधित मोबाइल कंपनीला दिला जातो. चोरीच्या फोनमध्ये कुणी सिम कार्ड टाकले तर लगेच नाव आणि पत्ता उपलब्ध होतो. त्यामुळे चोरीचा मोबाइल सापडतो. याची कल्पना आल्याने आता चोरटय़ांनी हे मोबाइल फोन नेपाळ वा अन्यत्र पाठविण्यास सुरुवात केली. आता तर आयएमईआय क्रमांक बदलण्याचे सॉफ्टवेअर आल्याने चोरटय़ांचे फावले आहे. मात्र पोलिसांपुढील आव्हान वाढले आहे.

मोबाइल फोनचे लोकेशन शोधण्यामध्ये आयएमईआय क्रमांक महत्त्वाची भूमिका बजावतो. परंतु सॉफ्टवेअर वापरून हा क्रमांक बदलता येतो, हे स्पष्ट झाले आहे. गुन्ह्य़ाची उकल करताना हा स्रोत खूप महत्त्वाचा असतो. आता पोलिसांपुढील आव्हानात आणखी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञान बदलत असून पोलिसांपुढे ते एक आव्हानच आहे. आयएमईआय क्रमांक बदलला गेल्यामुळे मोबाइल फोनचा शोध घेणे कठीण होईल; परंतु चुकीचा आयएमईआय क्रमांकामुळेही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे ग्राहकांनी अधिकृत दुकानातून पावती घेऊनच मोबाइल फोन खरेदी करावा
– अतुलचंद्र कुलकर्णी, सहआयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग