कल्याण न्यायालयात सुरू असलेल्या दोन खटल्यांच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल मनसेप्रमुख राज ठाकरे यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड करण्यात आला. मात्र अटक वॉरंट रद्द करण्यासंदर्भातील सुनावणी ९ जुलै रोजी करण्यात
येणार आहे.
२००८ मध्ये कल्याण रेल्वे स्थानकामध्ये नोकरभरतीसाठी आलेल्या परप्रांतीय तरुणांना मारहाण करण्यासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी तसेच २०१० मध्ये झालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या वेळी हद्द सोडण्याचे आदेश न पाळल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यांच्या सुनावणीदरम्यान दोन-तीन तारखांना गैरहजर राहिल्याबद्दल न्यायमूर्ती ए. बी. मारलेचा यांनी त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. सरकारी वकील राजश्री कदम यांनी अटक वॉरंटसंबंधी वेळ मागून घेतल्याने पुढील सुनावणी आता ९ जुलै रोजी होणार आहे. राज ठाकरे यांच्या वतीने अ‍ॅड. दीपेश पटेल व विद्या मोहिते यांनी काम पाहिले. परप्रांतीय तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारणाऱ्या रामनाथ सोनावणे यांचीही राज ठाकरे यांनी भेट घेतली.