IMG-20141215-WA0006मुंबई सेंट्रल येथील रेल्वे कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या २१ मजल्यांच्या इमारतीला सोमवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. चौथ्या मजल्यावर लागलेली आग इलेक्ट्रिक तारांमधून टेरेसपर्यंत पोहोचली. मात्र अग्निशमन दलाने या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले व ५० जणांची सुटका केली. त्यातील १४ जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पालिकेच्या नायर रुग्णालयाशेजारीच असलेल्या या इमारतीत ४० कुटुंब राहतात. आठ अग्निशमन गाडय़ा व पाच पाण्याचे टँकर रवाना करण्यात आले. चार रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचल्या. चौथ्या मजल्यावर आग लागली तेव्हा प्रचंड धूर येऊ लागला आणि घाबरून लोक सैरावैरा पळू लागले, त्यामुळे अग्निशमन दलाला बचावकार्यात अडथळे आले. सुटका केलेल्या ५० पैकी १४ लोक कमी-अधिक प्रमाणात जखमी झाले होते.
त्यातील पाच जणांना नायरमध्ये दाखल करण्यात आले. इतर जखमी भायखळा येथील रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात उपचार घेत आहेत. दुपारी ३.४५ वाजता आग पूर्ण आटोक्यात आली.
आगीमुळे जिन्यामध्ये असलेले सामान, लाकडी दरवाजे, कपडे जळाले. इलेक्ट्रिक वायरिंगच्या डक्टिंगमध्ये टाकलेल्या सामानाला आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्याचप्रमाणे शॉर्ट सर्किटची शक्यताही अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी फेटाळली नाही.