सर्व कलाकार व सेलिब्रेटी सुरक्षित; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
‘मेक इन इंडिया’ सप्ताहअंतर्गत रविवारी गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आलेला ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रम सुरू असतानाच व्यासपीठाला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठय़ा प्रमाणात आग लागली. जोरदार वाऱ्यांमुळे आग दहा मिनिटांत संपूर्ण व्यासपीठावर पसरली. आग लागताच व्यासपीठासमोर बसलेले राज्यपाल, मुख्यमंत्री, राजकीय नेते, मान्यवर तसेच विदेशातील राजनैतिक अधिकारी यांना तातडीने सुरक्षितस्थळी नेण्यात आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणीही जखमी झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा घटनास्थळ गाठून आग आटोक्यात येईपर्यंत तेथे तळ ठोकला. आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात कोणतेही बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संध्याकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या ‘महाराष्ट्र रजनी’मध्ये तासाभरानंतर पूजा सावंत आणि सहकारी यांचे ‘आता वाजले की बारा’ या लावणी नृत्याचे सादरीकरण सुरू होते. त्या वेळी व्यासपीठाच्या खाली आग दिसू लागली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी व्यासपीठासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, आमिर खान आणि अन्य दिग्गज सेलिब्रेटी उपस्थित होते.
आग लागल्याचे दिसताच सर्व मान्यवर व व्यासपीठावरील कलाकारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या पाच हजारांहून अधिक प्रेक्षकांना कोणत्याही चेंगराचेंगरीशिवाय प्रवेशद्वारातून बाहेर काढले गेले. कार्यक्रमस्थळाजवळून प्रेक्षकांना लवकरात लवकर दूर जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले. मात्र तरीही या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.
कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या अग्निशमन दलाच्या चार बंबांनी आग विझवण्यास सुरुवात केली. त्यानंतर आणखी दहा बंब मागवण्यात आले. गिरगाव चौपाटीवर जोरदार वाऱ्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळे येत होते. मात्र अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
लावणी नृत्याच्या सादरीकरणाआधी व्यासपीठावर शोभेच्या फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली होती. त्या फटाक्यांच्या ठिणग्यांनी ही आग लागली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. व्यासपीठाच्या ठिकाणी सात मोठय़ा क्रेन्स लावण्यात आल्या होत्या. या क्रेन्सवरील मोठे लाइट्सही आगीत खाक झाले.

कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच होतील – मुख्यमंत्री
‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाअंतर्गत रविवारी गिरगाव चौपाटीवरील ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमप्रसंगी लागलेल्या आगीची घटना दुर्दैवी आहे.या आगीच्या घटनेचा कोणताही परिणाम ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातील अन्य कार्यक्रमांवर होणार नाही. ते ठरल्यानुसार पार पडतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमस्थळी आपत्कालीन यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणेचा कृती आराखडा तयार ठेवण्यात आला होता. त्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळविण्यात आले. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत ठरलेले अन्य कार्यक्रम पार पाडताना अधिक काळजी घेण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.या दुर्घटनेनंतर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
व्यासपीठावर फुटलेल्या फटाक्यांमुळे ठिणगी उडून आग लागली आणि त्यानंतर शॉर्ट सर्किट झाले, असे प्रथमदर्शनी दिसत आहे. गिरगाव चौपाटीवरील वारा तसेच कार्यक्रमस्थळी असलेल्या कार्बन सिलेंडरमुळे ही आग वेगात पसरली. या प्रकरणी सखोल चौकशी करून त्याचा अहवाल येत्या दोन दिवसांत सादर करू.
– प्रभात रहांगदळे,
अग्निशमन दल प्रमुख