आजवर भारतीय नौदल किंवा तटरक्षक दलात दाखल झालेल्या युद्धनौका किंवा गस्तीनौका यांची बांधणी भारताबाहेर किंवा गेल्या काही वर्षांत भारतामध्येच, पण नौदलाच्या अखत्यारितील विविध गोदींमध्ये करण्यात आली होती. आता मात्र प्रथमच एल अ‍ॅण्ड टी या खासगी क्षेत्रातील कंपनीने भारतामध्ये स्वयंपूर्ण पद्धतीने डिझाइन आणि बांधणी केलेली अतिवेगवान अटकाव नौका भारतीय तटरक्षक दलात यशस्वीरीत्या दाखल झाली आहे. त्यामुळे संरक्षण उद्योगामध्ये आता एका नव्या पर्वाला सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.
भारतामध्ये मुंबईत माझगाव गोदी, कोलकाता येथे गार्डन रिच, शिवाय गोवा आणि कोची येथील शिपयार्डमध्ये नौदल किंवा तटरक्षक दलासाठी जहाजबांधणी केली जाते. हे सर्व सार्वजनिक उपक्रम असले तरी ते थेट संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतात.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने आपला विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आपल्या गरजेमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली. अधिक नौका आणि युद्धनौकांची गरज विदेशातून भागवायची म्हटल्यास त्यावर भरपूर विदेशी गंगाजळी खर्च करावी लागणार, असे लक्षात आले. त्याच वेळेस याचीही जाणीव झाली की, भारतातील खासगी उद्योगांमध्ये यासाठीची आवश्यक ती सर्व क्षमता आहे. त्यानंतर सीआयआयसारख्या संस्थांना मध्यस्ती करण्याची विनंती करण्यात आली आणि संरक्षण उद्योगामध्ये खासगी संस्था आणि कंपन्यांना दरवाजे खुले झाले.
याआधी लहान-सहान कामांसाठी खासगी उद्योगांचा वापर केला जात होता. पण सुमारे आठ वर्षांपूर्वीच्या त्या निर्णयाने नौदला समोरचा विस्ताराचा प्रश्न सोडवलाच पण खासगी उद्योगासाठीही नवीन कवाडे खुली करणारा ठरला. आता तटरक्षक दाखल झालेली पहिली अतिवेगवान अटकाव नौका हा त्याचाच परिपाक आहे.
ही अतिवेगवान अटकाव नौका तयार करणाऱ्या ‘एल अ‍ॅण्ड टी’ने हा खासगी उद्योगासाठीचा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. अशा एकूण ३६ अतिवेगवान नौका तयार करण्यात येणार असून त्यासाठी भारतीय तटरक्षक दलासोबत एकूण ९७७ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे.      

काय आहे ही अतिवेगवान अटकाव नौका?
प्रामुख्याने सागरकिनाऱ्याजवळच्या उथळ पाण्याच्या परिसरात ही अतिवेगवान अटकाव नौका काम करते. किनाऱ्याजवळ पाणी उथळ असल्याने मोठय़ा युद्धनौका किंवा गस्तीनौकाही तिथे नेणे शक्य नसते. अशा अवस्थेत कारवाईसाठी ही नौका अतिशय उपयुक्त असते. एल अ‍ॅण्ड टीने तयार केलेल्या या नौकेचा वेग ताशी ४० सागरी मैल एवढा आहे. अ‍ॅल्युमिनिअम संयुगापासून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात दोन वॉटर जेट प्रोपल्शन यंत्रणांचा वापर करण्यात आला आहे. ही अटकाव नौका आता तिच्या सर्व सागरी चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करून पोरबंदर येथील तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे.