मुंबई मेट्रोमधून मासे घेऊन जाणाऱ्या एका नागरिकाला अडविण्यात आल्याच्या वृत्ताची संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, साऱ्याच राजकीय पक्षांनी ‘रिलायन्स’च्या दादागिरीविरुद्ध आवाज उठविला आहे. निर्णयाचा फेरविचार न झाल्यास प्रसंगी मेट्रोमध्ये घुसण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

मुंबईत शाकाहारी विरुद्ध मांसाहारी वाद सुरू झाला आहे. यातच मेट्रोमध्ये मच्छी घेऊन जाणाऱ्या एका नागरिकाला अडविण्यात आल्याने त्याला शाकाहारी विरुद्ध मांसाहारी वादाची फोडणी देण्याचा प्रयत्न  नेत्यांनी केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेने भाजपला लक्ष्य केले असले तरी भाजपचे आशीष शेलार यांनी या निर्णयाला विरोध केला.

स्वातंत्र्यावर गदा- निरुपम

नागरिकांच्या आचार-विचार स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न असल्याचे मेट्रोमध्ये मच्छीबंदीवरून स्पष्ट होते.कोणी काय खायचे किंवा कोणी काय खरेदी करायचे याची सक्ती शासन करू शकत नाही, असे संजय निरूपम म्हणाले.

रिलायन्सची दादागिरी खपवून घेणार नाही -शेलार

उपनगरी रेल्वेमधून कोळी बांधवांना आणि प्रवाशांनाही मासे नेता येतात, मग मेट्रोमधून त्यास प्रतिबंध घालणे चुकीचे आहे. रिलायन्सची दादागिरी खपवून घेणार नाही, असे भाजप मुंबई अध्यक्ष आशीष शेलार म्हणाले.

बंदी चुकीची – सुनील प्रभू

मेट्रोमधून मासे नेण्यास परवानगी न देण्याचा निर्णय चुकीचा आहे, असे सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले.

लोकहित महत्वाचे -मलिक

मेट्रो गाडय़ा या वातानुकूलित असल्याने बंद असतात. अशा वेळी माशामुळे दरुगधी पसरू शकते. लोकहिताचा विचार महत्वाचा आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.

विरोध का? –शालिनी ठाकरे

मासे, मटण वाहतुकीला मेट्रोमध्येच विरोध का? मनसेचे कार्यकर्ते प्रसंगी मेट्रोमध्ये घुसून मासे व मटण नेतील, असा इशारा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी दिला.

मांसाहारावरून सेना-भाजपमध्ये संघर्ष

जैन समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या पर्युषण पर्वात चार दिवस आणि गणेशोत्सवाच्या काळात चार दिवस असे एकूण आठ दिवस कत्तलखाने बंद ठेवावेत, या भाजप आमदार राज पुरोहित यांच्या मागणीस शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. जैन धर्मीयांच्या भावना आम्ही समजू शकतो, पण नागरिकांना ताजे मांस पुरविणे, ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी बजावले आहे. मात्र आमदार राज पुरोहित हे आपल्या मागणीवर ठाम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही दाद मागणार आहेत.

पुरोहित यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून पर्युषण पर्व व गणेशोत्सवात कत्तलखाने बंद करण्याची मागणी केल्याने मांसाहारींमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

पण आठ दिवस कत्तलखाने बंद ठेवण्यास शिवसेनेचा विरोध आहे. आम्ही मांस खाण्यास विरोध करीत नसून कत्तलखाने बंद ठेवण्याची विनंती केली असल्याचे पुरोहित यांचे म्हणणे आहे. शाकाहार-मांसाहाराच्या वादात पडण्यास मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी मात्र नकार दिला आहे. महापालिकेने केवळ दोनच दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी हा वाद वाढणार की पडदा पडणार, हे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर अवलंबून राहील.