प्रचंड प्रमाणात सांडपाणी आणि त्यावरील शेवाळामुळे वांद्रे ते वरळीच्या सागरी पट्टय़ात तारली माशांचा जणू महापूर आला आहे. प्रदूषणामुळे एकीकडे किनाऱ्यावरील मासे नष्ट झाल्याचा अनुभव येत असताना तारली मासे मात्र लाखोच्या संख्येने कोळ्यांच्या जाळ्यात सापडत आहेत. चवीला उत्तम असणाऱ्या या माशांमुळे खवय्ये त्यावर तुटून पडत असले तरी, यामुळे आरोग्याच्या कोणत्या समस्या उद्भवू शकतात, यावर अद्याप शास्त्रोक्त अभ्यास झालेला नाही.
तारली मासे लांबुडके, पोटाकडे गोल असतात. गेल्या काही वर्षांत ते बांगडय़ाला पर्याय ठरले आहेत. किरकोळ बाजारातही १०० रुपये किलोने मिळत असलेली ही स्वस्त मासळी पूर्वेकडील देशांमध्येही मोठय़ा प्रमाणात निर्यात केली जाते. मुंबईच्या किनाऱ्यालगत रोज टनावारी हे मासे मिळतात. मात्र सांडपाण्यात वाढणारे हे मासे चिंतेचा विषय ठरले आहेत. जिथे जिथे नदी, नाले किंवा गटारे समुद्राला मिळतात, तिथे हे मासे गोळा होतात, असे निरीक्षण मच्छीमार नेते रामदास संधे यांनी नोंदवले.
अरबी समुद्राच्या दक्षिण भागातील तापमान  वाढल्यामुळे तुलनेने थंड असलेल्या उत्तरेकडे तारली मासे सरकले आहेत. सांडपाण्यात वाढणारे शेवाळ हे या माशांचे खाद्य आहे. त्यामुळे त्यांची संख्या वाढली आहे, अशी माहिती केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन केंद्राचे माजी संशोधक डॉ. विनय देशमुख यांनी दिली. हे मासे शिजवल्यावर त्याला तेल सुटते, त्या तेलाचा वास काहींना सहन होत नाही. मात्र या माशांच्या आरोग्यावरील परिणामांबाबत सध्या तरी तक्रारी नाहीत. अर्थात, या माशांवर अजूनही शास्त्रोक्त अभ्यास झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.