खासगी कंपन्यांकडून किनाऱ्यालगत अनधिकृत भराव

गेल्या कित्येक वर्षांपासून मासेमारी या परंपरागत व्यवसायाच्या आधारे उदरनिर्वाह करणाऱ्या चेंबूरच्या माहुल गावमधील रहिवाशांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. या परिसरातील खासगी कंपन्यांकडून किनाऱ्यालगत मोठय़ा प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात येत असल्याने येथील खाडी बुजण्याच्या मार्गावर असून याचा फटका जैवविविधतेसोबतच परिसरातील मच्छीमारांनाही बसत आहे.

कोळी बांधवांचा मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवस विश्रांती घेऊन, नारळी पौर्णिमेनंतर कोळी बांधव पुन्हा मासेमारीला सुरुवात करतात. त्यानुसार माहुल गावातील कोळी बांधवांनीदेखील मासेमारीला सध्या सुरुवात केली आहे. मात्र सध्या या कोळी बांधवांना माहुलच्या किनाऱ्यालगत टाकण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माहुल गावालगत अनेक तेल आणि वीज कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या बांधकामातून निघणारा राडारोडा तसेच मातीचा भराव खाडीकिनारी टाकण्यात येतो. त्यामुळे खाडीकिनारी गाळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका माहुलमधील मच्छीमारांना बसत आहे. या भरावामुळे मच्छीमारांच्या बोटी काढण्यात अडथळा येतो. अनेकदा मासेमारीसाठी टाकण्यात येणाऱ्या जाळय़ांवरच भराव टाकण्यात येत असल्याने जाळी तुटून २०-२५ हजार रुपयांचे नुकसान होते, अशी माहिती येथील कोळी बांधवांनी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून या खासगी कंपन्यांची ही मुजोरी या ठिकाणी सुरू असल्याने माहुल गावातील मासेमारी करणाऱ्या तीनशेपेक्षा अधिक कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी या कोळी बांधवांनी स्थानिक आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि पोलिसांनादेखील पत्र लिहून या कंपन्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

या परिसरात असलेल्या तेल कंपन्यांमुळे आमचा व्यवसाय कमी झाला आहे. त्यातच सध्या या भरावामुळे आमचा व्यवसाय बंदच पडण्याची वेळ आली आहे. आमचा या खासगी कंपन्यांच्या कामाला विरोध नाही. मात्र त्यांनीदेखील आमचा विचार करायला हवा.

– वसंत कोळी, स्थानिक रहिवासी