सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्दनजीक अपघात

चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर उड्डाणपूलावरुन थेट वस्तीमध्ये कोसळून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्दच्या सोनापूर वस्तीमध्ये शनिवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास डंपर पडला. डंपर काढण्यासाठी मोठय़ा क्रेन मागवाव्या लागल्या. शनिवारी दुपारी २.३० च्या सुमारास डंपर वस्तीमधून काढण्यात आला. डंपर उचलण्याच्या कामासाठी दुपारी तासभर नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती.

सायन-पनवेल महामार्गावरुन भरधाव वेगात जाणारा ‘एमएच-४३-वाय-७८१५’ क्रमांकाच्या डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि डंपर मानखुर्द उड्डाणपूलावरुन खाली पडला. उड्डाणपूलाशेजारच्या जयहिंद नगर, सोनापूर येथील दोन घरांवर हा डंपर पडला. कोसळलेल्या डंपरच्या हादऱ्याने पठारे कुटुंबीयांच्या घराची भिंत पडली. यात जयश्रीका पठारे (२९), लता (९), गॅलॅक्सी (५), तराणा (१०), रॉक्सी (९ महिने) हे जखमी झाले. तरानाच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून रॉक्सीच्या डोक्याला मुका मार लागला आहे. सर्व जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर डंपरचालक धर्मेंद्र (३९ वर्षे), क्लीनर संजय (३२) यांना किरकोळ जखमा झाल्या. मानखुर्द पोलिसांनी धर्मेंद्रवर निष्काळजीपणे वाहन चालवून इतरांच्या जीवितास धोका उत्पन्न होणारे कृत्य केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

वाहतुकीचा खोळंबा

वस्तीत कोसळलेला डंपर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी क्रेन मागवावी लागली. सकाळी १० च्या सुमारास ही क्रेन घटनास्थळी दाखल झाली. उड्डाणपूलापासून वस्ती सुमारे ४० फूट खाली आहे. त्यातही रस्त्याच्या कडेचा भाग कमकुवत असल्याने डंपर उचलताना क्रेनचा तोल जाऊ नये यासाठी पक्क्य़ा रस्त्यावर क्रेन उभी करुन तो काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी वाशीच्या दिशेने जाणारी वाहतूक दुपारी १.३० वाजल्यापासून थांबविण्यात आली होती. त्यामुळे वाहतूकीचा प्रचंड खोळंबा झाला. वाहनांच्या रांगा मानखुर्दपासून देवनापर्यंत लागल्या होत्या. दु. २.३० वाजता डंपर उचलून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आला आणि त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

अनर्थ टळला

उड्डाणपूलाला खेटूनच सोनापूर ही वस्ती आहे. डंपरचा वेग कमी असताना चालकाला झोप आल्याने किंवा नियंत्रण सुटल्याने उड्डाणपूलाचा संरक्षक कठडा तोडून डंपर वस्तीवर कोसळला. पण, डंपर वेगात घरावर कोसळला असता, तर मनुष्यहानी झाली असती, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली.