सहार येथील एका पंचतारांकित हॉटेलबाहेर सापळा रचून मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने एका केनियन नागरिकाला अटक केली. अमली पदार्थाच्या तस्करीच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या या केनियन नागरिकाकडून पोलिसांनी तब्बल ७.५ किलो सोने जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत २.२५ कोटी रुपये आहे.

एका केनियन नागरिकाने अमली पदार्थाची मोठय़ा प्रमाणावर तस्करी केली असून, तो सहारच्या हयात रिजन्सी हॉटेलमध्ये उतरला असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाला शनिवारी मिळाली. कक्षाचे पोलीस उपायुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संतोष भालेकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक सकपाळ यांच्या नेतृत्वात पथकाने हॉटेलच्या आसपास पाळत ठेवली होती. संशयित व्यक्ती पथकाला दिसल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. टेडी मुटुमा मुथी (२५वर्षे) असे या केनियन नागरिकाचे नाव होते. त्याची झडती घेतली असता बॅगेच्या एका कप्प्यात दडवून ठेवलेल्या सोन्याच्या  ७.५ किलोच्या विटा आढळून आल्या. आपल्याकडे याचे अधिकृत दस्तावेज असल्याचे तो सांगू लागला. पोलिसांनी त्याला सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे.