सतत जिवंत असलेल्या मुंबई शहरातील नैराश्य आणि मानसिक तणावाचे तसेच त्यापोटी होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.  गेल्या ४८ तासांत पाच जणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  
कुर्ला पश्चिम येथे नौपाडा परिसरात राहणाऱ्या अवधेश जैस्वाल (२८) या भाजीविक्रेत्याने शनिवारी याच परिसरातील एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत स्वत:ला टांगून घेतले. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या शर्टावर आपल्या चार नातेवाइकांची नावे लिहून तेच आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचेही लिहिले होते.  या चारही नातेवाइकांना पोलिसांनी अटक केली आहे. पेडर रोडवरील ओशियानिक इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून बिना वज्राणी या ४४ वर्षीय महिलेने स्वत:ला झोकून दिले. या घटनेत तिचा मृत्यू झाला. बीनाला नैराश्याने ग्रासल्याचे तिचे वडील गुलाबराय यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, केईएम रुग्णालयात पीपीटी विभागाच्या जिन्याखाली एका तरुणाचा मृतदेह वायरने गळा आवळल्याच्या स्थितीत सोमवारी आढळला. या तरुणाची ओळख पटली नसून तो साधारण २५ वर्षांचा असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील ग्रीन एकर्स या इमारतीत राहणाऱ्या एकता बब्बर (३५) या मॉडेलने रविवारी रात्री घरातून उडी मारून आत्महत्या केली. वडिलांचे निधन झाल्यानंतर आलेल्या नैराश्यातून तिने हे पाऊल उचलल्याची शक्यता ओशिवरा पोलिसांनी वर्तवली आहे.  खेरवाडी येथील शासकीय वसाहतीत एका तरुणाने सोमवारी आत्महत्या केली. मात्र या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.