मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने दोन महिन्यांपूर्वी बँकांतील मुदत ठेवींचा घोटाळा करणाऱ्यांविरुद्ध सुरू केलेल्या तपासाची व्याप्ती वाढतच असून ती किमान हजार कोटींच्या घरात असावी, असा अंदाज तपासाशी संबधित वरिष्ठ पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग तपास करीत असून सकृद्दर्शनी या घोटाळ्यात संबंधित बँकांतील अधिकाऱ्यांचा थेट संबंध प्रस्थापित झालेला नाही. मात्र बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हा घोटाळा होऊच शकत नाही, असा संशयही या सूत्रांनी व्यक्त केला आहे.
साऊथ इंडिया एज्युकेशन सोसायटीच्या ५७ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी घोटाळ्यात शोमॅन ग्रुपच्या मोहम्मद फशिउद्दीन आणि त्याच्या इतर साथीदारांना अटक झाली होती. राष्ट्रीय बँकेत आकर्षक व्याज मिळेल, असे आमीष दाखवून मुदत ठेवी स्वीकारायच्या आणि त्या आपल्या कंपनीमार्फत बँकात ठेवून त्या हळूहळू काढून घ्यायच्या, अशी गुन्ह्य़ाची पद्धत होती. आतापर्यंत या कंपनीने युको, सिंडिकेट, बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि धनलक्ष्मी बँकांमध्ये मुदत ठेवी ठेवून त्यानंतर काढून घेतल्याचे तपासात उघड झाल्याचे कळते. या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या आदेशावरून मुंबई पोलिसांचा आर्थिक गुन्हे विभाग करीत आहे. आतापर्यंत दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांचा आर्थिक गुन्हे विभाग तपास करीत आहे. हे प्रकरण दोन महिन्यांपूर्वीचे आहे. याव्यतिरिक्त अधिक नवीन माहिती त्यात नाही.
– धनंजय कुलकर्णी,  उपायुक्त व प्रवक्ते, मुंबई पोलीस