शिवडी खाडीलगत नांगर टाकल्यामुळे रोहित पक्षी किल्ल्याच्या आश्रयाला

काही वर्षांपूर्वीपर्यंत हिवाळय़ाच्या दिवसांत देशविदेशांतून आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी तात्पुरता अधिवास असलेली शिवडीची खाडी आता या पाहुण्यांची निराशा करू लागली आहे. पावसाळय़ाच्या निमित्ताने या खाडीकिनारी आपल्या बोटी नांगरून ठेवणाऱ्या गुजरातमधील मच्छीमारांनी गेल्या दोन वर्षांपासून बोटींचा मुक्काम न हलवल्याने दरवर्षी खाडीकिनारी हजारोंच्या संख्येने दाखल होणाऱ्या फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांनी आता आपला मुक्काम शिवडी किल्ल्याजवळ हलवला आहे. तेथेही या पक्ष्यांची संख्या रोडावली असून अशीच परिस्थिती राहिल्यास, भविष्यात हे पक्षी मुंबईच्या वाटेला फिरकणार नाहीत, अशी भीती पक्षीप्रेमी व्यक्त करीत आहेत.

मुंबईतील शिवडी खाडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून गुजरात येथील कच्छ भागातून हिवाळ्यात फ्लेमिंगो पक्षी खाद्याच्या शोधार्थ येत असतात. या गुलाबी रंगाचे पंख असलेल्या या शुभ्र पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षीप्रेमी, छायाचित्रकार, विद्यार्थी यांची दरवर्षी गर्दी होत असते. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून येथे काही मच्छीमारांच्या बोटी येऊन उभ्या राहिल्या आहेत. शिवडी कोळीवाडय़ातील स्थानिक कोळी नागरिकांच्या सांगण्याप्रमाणे या बोटी गुजराती मच्छीमार, वर्सोवा येथील मच्छीमारांच्या आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या छोटय़ा होडय़ादेखील येथे उभ्या करता येत नाहीत, असे या मच्छीमारांचे म्हणणे आहे. या बोटी ज्या भागात आहेत तेथूनच लांब फ्लेमिंगो पक्ष्यांना पाहावे लागते. मात्र आता बोटींमुळे पर्यटकांना फ्लेमिंगोंचे दर्शन घेणे मुश्कील झाले आहे. तसेच या बोटी थेट कांदळवनांची कत्तल करून आत आल्या आहेत. तसेच ओहोटी असली की फ्लेमिंगो पक्षी आत खाडीमध्ये असतात, परंतु भरती आली की ते किनाऱ्याजवळ येतात. नेमक्या त्याच जागेत कांदळवनांची कत्तल करून या बोटी उभ्या राहिल्याने फ्लेमिंगोंनाही येथून काढता पाय घ्यावा लागला आहे. सध्या फ्लेमिंगोंचा मुक्काम शिवडी किल्ल्याच्या खालच्या भागात आहे. मात्र अतिक्रमण करणाऱ्या बोटींची संख्या वाढत असल्याने भविष्यात या पक्ष्यांना किल्ल्याचा आसरा घेणेही कठीण होण्याची शक्यता आहे. सध्या या भागात दोन मोठी लोखंडी जहाजे आली असून त्यांच्या दुरुस्तीकामामुळे होणारा आवाज आणि प्रदूषण यांचाही परिणाम येथील पक्ष्यांच्या अधिवासावर होत आहे.

नोटिशीला हरताळ

या ठिकाणी बोटी उभ्या करणाऱ्यांवर मुंबई पोर्ट ट्रस्टने नोटिशी बजावल्या आहेत. ‘ही जागा ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या अखत्यारीत येत असून त्यांनी येथे उभ्या असलेल्या प्रत्येक बोटीवर, आपण अनधिकृतरीत्या आला असून तुमच्या बोटींमुळे कांदळवने व फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासाचे नुकसान होत आहे,’ अशी नोटीस मुंबई पोर्ट ट्रस्टने बजावली आहे. मात्र त्यानंतरही या बोटी येथून हललेल्या नाहीत. या बोटींवर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

दोन-तीन वर्षांपासून आम्ही फ्लेमिंगोंचा येथे अभ्यास करतो आहोत. येथील बोटींमुळे ते काहीसे पुढे सरकले आहेत. तसेच त्यांची संख्याही कमी होत आहे. अनेकदा तक्रारी करूनही मुंबई पोर्ट व्यवस्थापन येथे लक्ष घालत नाही.’

– प्रदीप पाताडे, सागरी अभ्यासक

गेली काही वर्षे आम्ही या बोटी हटवण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट व पोलिसांकडे तक्रारी करीत आहोत. तरीदेखील या बोटी हटवल्या जात नाहीत. आम्ही त्रस्त झालो असून आम्हाला येथे मासेमारीदेखील करता येत नाही. यातील बहुतांश बोटी गुजराती मच्छीमारांच्या आहेत.

– लीलाधर पाटील, कोळी नागरिक, शिवडी कोळीवाडा